

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील वनविभागाच्या जमिनींच्या घोटाळ्याबाबत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना चौकशीची सूचना देण्यात आली असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मात्र, काही मंत्र्यांनी अधिकार्यांवर दबाव आणल्याची गोष्ट खासदारांना आताच कशी समजली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
संगमेश्वर तालुक्यातील वनजमीन घोटाळ्याबाबत आपण योग्य चौकशी करण्याची सूचना जिल्हाधिकारी व पोलिसांना दिली आहे. यात कोणी दोषी असतील तर त्यांच्या कारवाई निश्चित केली जाईल. मात्र इतक्या वर्षांनंतर या बाबत मंत्र्यांनी अधिकार्यांवर दबाव आणल्याची माहिती इतक्या उशिरा खासदारांना कशी मिळाली हा प्रश्न असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन दोन दिवसांपूर्वी खा. विनायक राऊत यांनी या संदर्भात आरोप केले होते.
बारसू रिफायनरीबाबत माती परीक्षण अहवाल आल्यानंतर संबंधित कंपनीने त्याला हिरवा कंदिल दिल्यावर आवश्यक पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याचेही ना. सामंत यांनी यावेळी सांगितले. चीनमध्ये अरामको कंपनी काही प्रकल्प करीत असले तरी येथील प्रकल्प होणार नाही, असे काही सांगितलेले नाही. त्यामुळे जमिनीच्या अहवालानंतर पुढील निर्णय होतील असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे नाईट लॅण्डींगबाबत विमान प्राधिकरण व तटरक्षक दलामध्ये पत्र व्यवहार सुरू असून, हे कामही लवकरच होणार आहे. त्यामुळे नाईट लॅण्डींगसाठी काम सुरू होणार आहे. रत्नागिरी विमानतळावर 80 सीटर विमान उतरेल या द़ृष्टीने धावपट्टीचे काम झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.