रत्नागिरी विमानतळावर महिनाभरात नाईट लँडिंग : उदय सामंत | पुढारी

रत्नागिरी विमानतळावर महिनाभरात नाईट लँडिंग : उदय सामंत

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  एमआयडीसीतील उद्योजकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यावर आपला भर असून, त्याद़ृष्टीने नवनवीन योजना आणल्या जात आहेत. महाराष्ट्रात उद्योजकांना गतिमान पायाभूत सुविधा देता याव्या, यासाठी पाचशे कोटींचा निधी देण्यात आला आहे. स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी नवनवे उद्योग याठिकाणी यायला हवेत. त्यासाठी उद्योजकांना चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक आहे. मोठ्या उद्योजकांना रत्नागिरीत सहज येता यावे, स्थानिकांनाही याचा उपयोग व्हावा, यासाठी रत्नागिरी विमानतळावर महिनाभरात नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.

एमआयडीसीच्या रत्नागिरीमधील नूतन विश्रामगृहाचा पायाभरणी समारंभ व वर्तुळाकार जुन्या विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचा समारंभ ना. सामंत यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. एमआयडीसीला कनेक्ट करणारी जी गावे आहेत त्यांचे रस्ते एमआयडीसीमार्फत केले जाणार आहेत. रत्नागिरीमध्ये शिरगाव, मिरजोळे, नाचणे, निवसर ग्रामपंचायतींमधील रस्ते हे एमआयडीसीला कनेक्ट केले जाणार आहेत. यासाठी 31 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चिपळुणातील खेर्डीसाठी दोन कोटी, लोटेसाठी दीड कोटीचा निधी देण्यात येणार आहे. रत्नागिरी एमआयडीसीतील उद्योजकांना रस्त्यांचा प्रश्न भेडसावू नये, यासाठी 13 कोटींचा निधी देण्यात आला असून, निविदा प्रक्रियाही झाली आहे. उद्योगमंत्री म्हणून काम करताना, रत्नागिरीमध्ये एखादी बैठक घ्यावी लागते, कधी उद्योजकांना बैठकांचे आयोजन करावे लागते. त्यासाठी सेव्हनस्टार दर्जाचे नूतन विश्रामगृह उभारण्यात येत असून, त्याचाच पायाभरणी समारंभ करण्यात आला. वर्षभरात हे विश्रामगृह उभे राहील, असे ना. सामंत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे 39 वर्षांपूर्वीच्या सर्कल रेस्टहाऊसचे नूतनीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे कामही वर्षभरात होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी सुमारे 88 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी उद्योजक व उद्योजक संघटना प्रतिनिधींनाही खडे बोल सुनावताना, उद्योजकांनीही स्थानिकांना संधी द्यायला हवी. कौशल्य विकासचे विविध उपक्रम रत्नागिरीसह जिल्ह्यात सुरू झाले आहेत. उद्योजकांना नेमके काय हवे याबाबत त्यांनी चर्चा केल्यास तसे कोर्स उपलब्ध करून देता येतील, असेही ना. सामंत यांनी सांगितले. रायगडमध्ये एका उद्योगासाठी कोरियातून कामगार आणण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. गेली अनेक वर्षे एमआयडीसीतील 88 कर्मचार्‍यांना कायम करण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र कोणीच यावर निर्णय घेतला नाही. मात्र आपण त्यांना आस्थापनेवर कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अद्यादेश दोन दिवसांत निघेल असेही त्यांनी सांगितले.

अनेकजण माझ्यावर टीका करतात की मी काहीही सांगतो, लोकांना फसवतो, परंतु युवा पिढीला काय हवे, भविष्यात काय लागणार आहे याचा विचार करून ते देण्यासाठी धडपडत असतो. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असताना सर्व प्रकारची कॉलेज आपल्या मतदार संघात पाहिजेत यासाठी आपला प्रयत्न होता. आज शासकीय इंजिनिअरींग कॉलेज सुरू झाले आहे. बीफार्मसी, संस्कृत उपकेंद्र सुरू झाले आहे. मेडिकल कॉलेज सुरू होणार आहे. येथील गरीब विद्यार्थ्यांनी याच ठिकाणी शिकावे, बाहेरून विद्यार्थ्यांनी यावे यासाठी आपला प्रयत्न होता, त्याबद्दल मी नक्कीच समाधानी असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. इंजिनिअरींग कॉलेजसाठी दीडशे कोटींची इमारत उभी रहात असून ती महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट इमारत असेल, असेही त्यांनी सांगितले.

उद्योजकांबरोबरच येथील सर्वसामान्य लोकांनाही विमानातून प्रवास करता यावा, यासाठी आपले सातत्याने प्रयत्न राहिले आहेत. रत्नागिरीतील विमानतळाची धावपट्टी ही महाराष्ट्रातील सर्वोत्तम धावपट्टी असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. महिनाभरात याठिकाणी नाईटलॅण्डींगची सुविधा निर्माण होणार आहे. त्यामुळे आपण दिवस-रात्र रत्नागिरीत कधीही प्रवास करून येथील जनता व उद्योजकांसाठी काम करू, असेही त्यांनी सांगितले. भारती शिपयार्ड कंपनीत शिपब्रेकींगचे काम सुरू झाले आहे. पंधरा दिवसांत वेरॉन कंपनी सुरू होईल त्यामुळे तरुणांच्या हाती काम मिळेल, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. एम. देवेंदर सिंह, एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुभाष तुपे, मुख्य अभियंता कोकण विभागाचे श्री. भांदेकर, मरिनर दिलीप भाटकर, डॉ. प्रशांत पटवर्धन, जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, मिरजोळे सरपंच गजानन गुरव, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे, उपकार्यकारी अभियंता बी. एन. पाटील यांच्यासह उद्योजक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button