अवकाळीचे संकट; ‘या’ भागात २५ मार्चपर्यंत पावसाची शक्यता | पुढारी

अवकाळीचे संकट; 'या' भागात २५ मार्चपर्यंत पावसाची शक्यता

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  कोकण किनारपट्टी भागालगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने अवकाळी पावसाला पोषक वातावरण आहे. अवकाळीचे संकट २५ मार्चपर्यंत कोकण किनारपट्टीवर रेंगाळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या कालावधीत रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

बुधवारीही काही भागात हलका पाऊस झाला. वातावरणात मळभ कायम राहिल्याने तापमानात घसरण झाली. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडातील काही जिल्ह्यांत २५ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील आठवड्यात अनेक भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला. त्यानंतर पावसाचे सावट ओसरले असून, तापमानात साधारण चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. मात्र, प्रत्यक्षात गुरुवारी सकाळी मळभाचेच आच्छादन होते. २५ मार्चपर्यंत अवकाळीचे संकट कायम असल्याचा अंदाज आता हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

२५ मार्चपर्यंत पावसाची शक्यता

शुक्रवारपासून मेघगर्जनेसह मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे

Back to top button