५ वर्षांपूर्वी हरवलेल्या विवाहितेचा लागला शोध; कोर्टाच्या आदेशान्वये सासरी रवानगी | पुढारी

५ वर्षांपूर्वी हरवलेल्या विवाहितेचा लागला शोध; कोर्टाच्या आदेशान्वये सासरी रवानगी

अलिबाग : पुढारी वृत्तसेवा : पाच वर्षापूर्वी विवाह होऊन कर्नाटकमधील सासरी गेलेली विवाहीता सासरहून हरवल्याप्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यावर न्यायालयाच्या आदेशान्वये रायगड पोलिसांनी केल्या तपासात, ही विवाहीतेने कर्नाटकातून तिच्या सासरहूनपळून जाऊन अन्य एका बरोबर विवाह करुन धुळे येथे रहात असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान तिचा दुसरा पती हा अट्टल फरार गुन्हेगार असल्याचे तपासात स्पष्ट झाले. न्यायालयात त्यांना हजर केले असता विवाहीतेस तिच्या धुळे येथील सासरी तर पती फरार आरोपी यास पुढील तपासाकरिता पोलीसांच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलिसांनी दिली आहे.

मुरुड शहरातील कुसुम ( नाव बदलेले ) हि १४ ऑगस्ट २०१७ रोजी तिचे मुधोळ, बागलकोट, कर्नाटक येथील सासरहून हरवल्या प्रकरणी (मिसिंग ) मुधोळ पोलीस ठाण्यात मनुष्य हरवणे अंतर्गत नोंद करण्यात आली होती. कुसुम हिच्या वडीलांनी रिट ऑफ हेबियस कॉर्पस अंतर्गत विशेष याचिका मुंबई उच्च न्यायालायत दाखल केली. या याचिकेमध्ये पोलीस अधीक्षक, रायगड आणि पोलीस निरीक्षक, मुरूड यांना प्रतिवादी केले होते. याचिकेच्या सुनावणीअंती उच्च न्यायालयाने रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना, त्यांनी स्वतः लक्ष घालुन शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे विशेष पोलीस पथक स्थापन करुन हरवलेल्या विवाहीतेचा कसून शोध घेण्यात आला होता. त्या तपासामध्ये हरवलेली विवाहीता कुसुम हि आरोपीत गिरीधर नथु भदाणे (रा. सामोडे, साक्री, जि.धुळे) याच्या सोबत पळुन गेली असल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपीत गिरीधर नथु भदाणे याचा पुर्वइतिहास रायगड पोलिसांनी तपासला असता, त्याच्या विरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात सन २०१८ मध्ये फसवणूकीचे तिने गुन्हे दाखल असुन त्या गुन्हयांमध्ये फरार आरोपी आहे. त्याच बरोबर रोहा पोलीस ठाण्यात बाल लैगीक अत्याचार कायद्यांतर्गत दाखल गुन्हयात तो न्यायालयीन कोठडीमध्ये असताना संचित रजेवर (फॅरोल) बाहेर आला होता. तो पुन्हा जेलमध्ये हजर झाला नाही आणि फरार होता.

या प्रकरणी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा ८ मार्च २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला व गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांच्याकडे देण्यात आला. तसेच त्यांनी दिलेल्या आदेशानुसार विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात आले. आरोपी गिरीधर नथु भदाणे याची तांत्रिकी विश्लेषणानुसार माहिती काढली असता तो गुजरात मधील सुरत जिल्ह्यशातील कडोदरा येथे असल्याची माहिती तपास पथकाला प्राप्त झाली. पोलीस विशेष तपास पथकांने तत्काळ सुरतमध्ये पोहोचून गेल्या साडेपाच वर्षांपासुन फरारी असलेला गिरीधर नथु भदाणे व तथाकथीत हरवलेली विवाहीता कुसुम यांना मु. अलदरू, पो. बगुमरा, ता. पळसाना येथुन ताब्यात सुरतमधील घेण्यात यश मिळवले.

आरोपी गिरीधर नथु भदाणे यास मुरूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. दरम्यान सुमन हिने मुंबई उच्च न्यायालयास सांगितल्याप्रमाणे तिच्या धुळे जिल्ह्यातील सामोडे, साक्री येथील सासरी पोलीस संरक्षणामध्ये गिरीधर नथु भदाणे याच्या घरी सोडण्याकरीता पोलीस पथकासह रवाना करण्यात आले असल्याची माहिती रायगड पोलीसांनी दिली आहे.

अंत्यत गुंतागुतींच्या आणि गेल्या साडेपाच वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार, रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल उ. झेंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ, परि. पोसई खोत, परि. पोसई फडतरे, परि. पोसई अविनाश पाटील, सफौ. सचिन वाणी, पोशि एम. टी. हंबीर, पोना एस.एन.रोहेकर, पोशि चोरगे, सायबर पोलीस ठाणे पोना अक्षय पाटील या पथकाने केला आहे.

Back to top button