युवकाच्या खूनप्रकरणी सहाजणांना जन्मठेप | पुढारी

युवकाच्या खूनप्रकरणी सहाजणांना जन्मठेप

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा :  चिंचेच्या झाडाची फांदी तोडली म्हणून जागेच्या वादातून खेड तालुक्यातील आवाशी देऊळवाडी येथील तरुणाचा खून केल्याप्रकरणी चिपळूणच्या जिल्हा सत्र न्यायालयाने सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल 7 वर्षांनंतर या प्रकरणी मृत ओंकार तुकाराम कदम याला न्याय मिळाला आहे. येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी हा निकाल दिला असून आता सहा आरोपींची रवानगी कोठडीत होणार आहे.

परशुराम घाटातील ओमेगा हॉटेलजवळ जंगलामध्ये 25 वर्षीय ओंकारचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह पिंपळी येथे कॅनॉलमध्ये टाकण्यात आला होता. एन्रॉन पुलाजवळ हा मृतदेह सापडला. यानंतर? ? पोलिसांची तपासाची चक्रे फिरली. या प्रकरणी वडील तुकाराम जयराम कदम यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात 1 जून 2015 रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये दीपक वामन आंब्रे (वय 40, रा. आवाशी), उमेश चंद्रसेन आंब्रे (34), विक्रमसिंग भागसिंग मेश्राम (34, रा. घरडा कॉलनी, मूळ रा. उत्तर प्रदेश), सागर पाटील (रा. पटवर्धन लोटे), संदीप हरिश्चंद्र आंब्रे (45), उमेश नारायण आंब्रे (48, सर्व रा. आवाशी देऊळवाडी) यांना जन्मठेप झाली आहे. अखेरच्या सुनावणीच्या दिवशी यातील मेश्राम हा आरोपी गैरहजर होता. त्याला वॉरंट बजावले आहे.

याबाबत सरकारी वकील अ‍ॅड. प्रफुल साळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 1 जून 2015 रोजी हा गुन्हा चिपळूण पोलिस ठाण्यात दाखल झाला. ओंकारचे वडील तुकाराम कदम यांनी वादग्रस्त जागेच्या सीमेवर असलेल्या चिंचेच्या झाडाच्या फांद्या तोडल्या. या कारणावरून 28-5-2015 रोजी आंब्रे व कदम कुटुंबामध्ये वाद झाला. यावेळी मारहाण देखील झाली. त्यानंतर या आरोपींनी परस्परांना भेटून ओंकारचा काटा काढण्याचा प्लॅन आखला. यानंतर हे सर्व मिळून तुकाराम कदम यांच्या घरी विचारण्यासाठी गेले. यावेळी? ? ओंकार कदम व वडील तुकाराम कदम यांना देखील मारहाण झाली. याआधी ओंकार याने दीपक आंब्रे याला पडवीवर पत्रे टाकण्यासाठी हरकत घेतली होती. त्याचा राग मनात धरून संगनमताने पूर्वनियोजित कट करून ओंकार याला त्याच्या खास मित्राकडून पार्टीचे आमंत्रण देण्यात आले. आपला मित्र पार्टीला बोलावतो म्हणून ओंकारही त्या दिवशी पार्टीला निघून गेला. मात्र, तो दोन दिवस झाले तरी घरी आला नाही. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. याच कालावधीत वाशिष्ठी नदीपात्रात ओंकारचा मृतदेह सापडला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली.

परशुराम घाटातील ओमेगा हॉटेलजवळील जंगलात ओंकारला बोलावले. त्याला एका दगडावर बसवून इतर आरोपींनी संगनमताने त्याचे डोके, हात-पाय धरले व दीपक आंब्रे याने चक्क मानेवर सुरी चालवली व मान कापली तर दुसर्‍याने जांभ्या दगडाने डोके ठेचले. त्यानंतर त्याचा मृतदेह झाडीत टाकण्यात आला. मात्र, काही वेळानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावावी आणि पुरावा नष्ट करावा या हेतूने हा मृतदेह पिंपळी येथील कॅनॉलमध्ये टाकला. दुसर्‍या दिवशी दुपारच्या वेळेस एन्रॉन पुलाजवळ ओंकारचा मृतदेह सापडला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली. तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी या प्रकरणी कसून तपास केला व सहा आरोपींवर 302चा गुन्हा दाखल केला. 2015 पासून 16 मार्च 2023 पर्यंत हा खटला न्यायालयात चालला. चिपळूण येथील जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. मोमीन यांनी या प्रकरणी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी आता कोठडीत होणार आहे.

Back to top button