रत्नागिरी : खेड पोलिसांनी रेल्वे थांबवून लावला अपहरण नाट्याचा छडा | पुढारी

रत्नागिरी : खेड पोलिसांनी रेल्वे थांबवून लावला अपहरण नाट्याचा छडा

खेड : पुढारी वृत्तसेवा : मीरा रोडमधील काशिमीरा पोलिस ठाणे येथे अपहरणाची नोंद झालेल्या तीन बेपत्ता अल्पवयीन मुलींना खेड पोलिसांनी माहिती मिळताच अवघ्या तासाच्या आत मंगळवार, दि. 7 रोजी खेड रेल्वे स्थानकात थांबलेल्या मांडवी एक्स्प्रेसमधून ताब्यात घेतले. दरम्यान, मुलींचे पालक त्यांना नेण्यासाठी निघाले आहेत. खेड पोलिसांच्या या कामगिरीबद्दल विशेष कौतुक होत आहे.

खेड पोलिस ठाण्यात दि. 7 रोजी रोजी सकाळी 11.30 वाजता दूरध्वनीद्वारे मीरा – भाईंदर वसई विरार आयुक्तालयाकडून खेड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक, सुजीत गडदे यांना काशिमीरा पोलीस ठाण्यात तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्याचे समजले. यातील तिन्ही मुलींचे मोबाईल लोकेशन कोकण रेल्वेमार्गे धावणार्‍या मांडवी एक्स्प्रेसमध्ये पोलिसांना दाखवत होते. ही गाडी खेडच्या दिशेने येत असल्याची माहिती खेड पोलिसांना मिळताच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजीत गडदे यांनी दोन पोलिस अधिकारी व 8 अंमलदार यांचे एक वेगळे पथक तयार केले. दुपारी 12.05 वाजता खेड रेल्वे स्थानक येथे येणार्‍या मांडवी एक्स्प्रेसच्या तपासणीसाठी रेल्वे प्रशासनासोबत समन्वय राखून 5 मिनिटे अधिक कालावधीकरिता खेड रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली.

होळीमुळे कोकणामध्ये जाण्या-येण्यासाठी प्रवाशांची रेल्वे गाड्यांसाठी गर्दी करत असतात, याची पूर्ण कल्पना तसेच वेळेची मर्यादा असतानाही या तिन्ही मुलींचा मांडवी एक्सप्रेमध्ये पोलिसांकडून कसून शोध घेण्यात आला. अखेरीस या मुली, रेल्वेच्या एका कोचमध्ये बसलेल्या सापडल्या. या तिन्ही मुलींना खेड पोलिस ठाण्यात सुखरूप आणण्यात आले. या मुलींकडे अधिक चौकशी केली असता या मुली त्यांचे घरा शेजारील गार्डनमध्ये फिरण्यासाठी गेल्या होत्या व त्यांना घरी जाण्यााठी उशीर झाल्याने आपले पालक आपल्याला आता ओरडतील, या भीतीने त्या निघाल्या असल्याचे वास्तव समोर आले. या तिन्ही मुलींना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्याकरिता काशिमिरा पोलिस ठाण्याचे पथक खेड पोलिस ठाणे येथे येण्यासाठी रवाना झाले आहे.

Back to top button