सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई- गोवा महामार्गावरचा प्रवास सुसाट झाला आहे. मात्र, कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील सर्व्हिस रोडचे भूसंपादन रखडल्याने याठिकाणी वाहतुकीला ब्रेक लागला आहे. परिणामी पूल तयार होऊनही भूसंपादन रखडल्याने वाहतूक सुरू करता येत नाही. यामुळे नांदगाव तिठा, ओटव फाटा तसेच प्रवासी निवारा शेड, दिशा दर्शक फलक, योग्य प्रकारे गटार व्यवस्था नसल्याने हायवेजवळील घराघरात अतिवृष्टीमध्ये पाणी घुसणे आदी विषयांवरून नांदगाव ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन नांदगाव येथे सुरू केले आहे.
हायवे प्राधिकरण व शासनाविराेधात ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने नांदगाव तिठा परिसर दणाणून गेला.
यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, माजी जि.प.बांधकाम सभापती नागेश मोरये, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, नांदगाव ग्रामपंचायत सदस्य अरुण बापार्डेकर, मजीद बटवाले, गवस साठविलकर, मंगेश पाटील, वृषाली मोरजकर, रेणूका पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, भाई मोरजकर, अब्दुल नावलेकर, बाळा मोरये, करीम बटवाले, इक्बाल बटवाले, श्री .लोके तसेच हायवे बाधीत शेतकरी आदी उपस्थित आहेत.
सर्व्हिस रस्त्यांच्या मागणीसाठी ७ मार्च २०२० रोजी ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले हाेते.
मात्र, जादा जागेच्या संपादनासाठी मोजणी करून ठेवण्या पलीकडे काहीच हालचाल झालेली नाही.
यानंतर आता सर्व्हिस रस्त्यांअभावी येथे वारंवार अपघात घडत आहेत.
त्यामुळे सर्व्हिस रस्त्यांसाठी कोणी वाली आहे का? असा प्रश्न नांदगावच्या सामान्य नागरिकांना पडला आहे.
तसेच रस्ता तयार होऊनही भूसंपादना अभावी ब्रीज सुरू न केल्याने मुंबई, फोंडाघाटकडे जाणारी वाहतूक नांदगाव तिठ्ठा येथे एकेरी मार्गावर सुरू आहे.
परिणामी अपघात, वाहतूक कोंडी असे अनेक समस्यां निर्माण झाल्या आहेत.
शासन व हायवे प्राधिकरण अधिकारी लक्ष देत नसल्याने ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा सरपंच सौ. आफ्रोजा नावलेकर यांनी दिला आहे.
याबाबत चर्चा करण्यासाठी हायवे प्राधिकारण खारेपाटण उपविभागचे श्री. कुमावत यानी भेट घेवून चर्चा केली आहे.
यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हेदुंळकर, महामार्ग पोलीस निरीक्षक के. एस. जाधव आदी उपस्थित होते.
हेही वाचलंत का?