आ. राजन साळवी यांची ‘एसीबी’कडून पुन्हा चौकशी | पुढारी

आ. राजन साळवी यांची ‘एसीबी’कडून पुन्हा चौकशी

राजापूर; पुढारी वृत्तसेवा :  राजापूरचे आमदार डॉ. राजन साळवी बुधवारी अलिबाग येथे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात आधीच्या चौकशीदरम्यान मागितलेली मालमत्ताविषयक कागदपत्रे घेऊन हजर राहून चौकशीला सामोरे गेले. दि. 20 जानेवारी रोजी आमदार राजन साळवी यांची 6 तास लाचलुचपत कार्यालयात अधिकार्‍यांनी चौकशी केली होती. यावेळी साळवी यांच्या मालमत्तेबाबत काही कागदपत्र सादर करण्यास विभागाने सांगितले होते. त्यानुसार साळवी बुधवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहिले.

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या मालमत्तेबाबत रायगडमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डिसेंबर महिन्यात चौकशीची नोटीस पाठवली होती. त्यानंतर आमदार साळवी लाचलुचपत कार्यालयात येऊन चौकशीला हजरही झाले होते. त्यानंतर दि. 20 जानेवारी रोजी मालमत्तेची कागदपत्र घेऊन ते चौकशीसाठी हजर झाले होते. यावेळी त्यांच्याविषयी, तसेच कुटुंबीयांच्या मालमत्तेची चौकशी केली होती. आमदार साळवी यांनी सादर केलेली कागदपत्रांबाबत समाधान न झाल्याने इतर कागदपत्रे सादर करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना सांगितले होते. त्यानुसार बुधवारी दुपारी 12 वाजता आमदार साळवी यांनी अलिबाग कार्यालयात हजर राहून कागदपत्रे सादर केली असून त्या नंतर तरी विभागाचे समाधान होणार की, आमदार साळवी याच्या अडचणी वाढणार हे चौकशीनंतर समोर येणार आहे.

Back to top button