सागरी महामार्गावर नगरे
सागरी महामार्गावर नगरे

सागरी महामार्गावर वसणार 12 नवी नगरे

रायगड, सुयोग आंग्रे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालाच समांतर असलेल्या आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या रेवस ते रेडी या सागरी महामार्गासाठीही राज्य सरकारने 9,573 कोटींची तरतूद करत कोकणच्या पर्यटन विकासाची तुतारी फुंकली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतून जाणारा हा महामार्ग कोकण पर्यटन विकासासाठी वरदान ठरणारा आहे. त्याचबरोबर या महामार्गामुळे 12 नवनगरे विकसित करण्याच्या द़ृष्टीने शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे. यामध्ये रायगडातील 6 व रत्नागिरी जिल्ह्यातील 6 गावे आणि नवीन शहरांचा विकसनाचा नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे काम फास्टट्रॅकवर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन शहरे नव्याने विकसित करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण पाहता मुंबई-मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरी करणानंतर त्याला समांतर असलेल्या आणि कोकण पर्यटनाच्या द़ृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा 540 कि. मी. लांबीचा सागरी महामार्ग रेवस-दिघी-जैतापूर-वेंगुर्ला-रेडी असा जाणारा हा महामार्ग अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहे. रेवस ते रेडी हा सागरी महामार्ग अद्यापही अविकसित आहे. तीन जिल्ह्यांतून जाणारा हा महामार्ग अरबी समुद्राच्या किनार्‍याने जातो. विविध धार्मिक स्थळे, पर्यटन क्षेत्रे, समुद्र किनारे, बंदरे, मासळी मार्केट, विमानतळ आदी या महामार्गावर आहेत. त्यामुळे हा महामार्ग रायगड , रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या पर्यटन विकासासाठी वरदान ठरणारा आहे. 540 कि.मी. चा हा मार्ग दुपदरी असणार आहे.

सागरी महामार्ग रायगड जिल्ह्यातून जात असल्याने या महामार्गामुळे जिल्ह्यातील अलिबाग, पेण, उरण, रोहा, मुरूड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या प्रमुख शहरांच्या विकासाच्या कक्षा रुंदावणार आहेत. त्याचबरोबर मांडवा, सासवणे, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, कोर्लई, नांदगाव, मुरूड, दिघी, दिवे आगार, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर या पर्यटनस्थळांना सागरी पर्यटनाचे महत्त्व वाढणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी ही प्रमुख शहरे व गणपतीपुळे, गणेशपुळे, पावस, नाणीज, आंबडवे या पर्यटनस्थळी अधिक विकास होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड, वेंगुर्ला या शहरांमध्ये विकासाचा मार्ग मोकळा होईल. कोकणातील तीन जिल्ह्यात या महामार्गाने आर्थिक समृद्धी येणार आहे.

रेवस, अलिबाग, मुरुड, दिघी, हरिहरेश्वार, बाणकोट, दापोली, गुहागर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, जैतापूर, देवगड, मालवण आणि वेंगुर्ला यां प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणारा हा मार्ग असणार आहे. या मार्गावर 44 खाडी पूल, 21 मोठे पूल आणि 22 लहान पूलांचा समावेश आहे. रायगडमध्ये मुरुड, नांदगाव, आदआव, धारावी, रत्नागिरीत, वेसवी, बाणकोट, वेळास, पालशेत, रिळ, शिरगाव, मालगुंड, कशेळी, आडिवरे या गावांपलीकडून रस्ता काढण्यात येणार आहे. अशीच परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, कातवण, मिठबाव, केळुस, टाक व म्हापण या गावांत आहे. रस्त्याची देखभाल करण्याकरिता स्वतंत्र निधी उपलब्ध करण्याची मागणी स्थानिक पातळीवरून केली जात आहे.

पर्यटनस्थळांना मिळणार नवा आयाम

एकीकडे सागरी महामार्गाला आर्थिक तरतूद करत चालना दिली जात असतानाच मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गावर रस्ते विकास महामंडळाने ज्याप्रमाणे नवनगरे विकसित केली, त्याच धर्तीवर कोकणातही ऐतिहासिक, पर्यटन आणि उत्पादन क्षेत्राचा विचार करून या मार्गावर नवनगरे विकसित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. अलिबाग, नवीन मुरूड, नवीन दिघी, दिवे आगार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर या रायगड जिल्ह्यातील गावांबरोबरच दापोली, गुहागर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, राजापूर यांचा या विकसित होणार्‍या नवनगरांमध्ये समावेश होणार आहे. म्हणजेच आतापर्यंत पर्यटनद़ृष्ट्या सक्षम असणारी मात्र विकासाच्या द़ृष्टीने काहीशी विकसित असणारी महामार्गावरील गावे, पर्यटनस्थळांना नवा आयाम मिळू शकेल.

logo
Pudhari News
pudhari.news