रत्नागिरी : यंदा हापूस उशिरानेच मिळणार! | पुढारी

रत्नागिरी : यंदा हापूस उशिरानेच मिळणार!

दापोली; पुढारी वृत्तसेवा :  कोकणातील अतिशय महत्त्वाचे असणारे हापूस आंबा पीक यावर्षी उशिराने येण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदल देखील आंबा पिकाला पोषक नाहीत. कधी अति थंडी तर दिवसा उन्हाची काहिली अशा वातावरणामुळे यंदाही हापूस उशिरानेच बाजारात दाखल होणार आहे.

गेले काही दिवस कोकणात गारठा वाढल्याने आंबा बागा चांगल्याच मोहरल्या आहेत. काही ठिकाणी तर आंबा झाडांना फळधारणा सुद्धा होत आहे. त्यामुळे हापूस बागायतदारांत आनंदाचे वातावरण आहे. मात्र, तरीही वातावरणात वारंवार होणारे बदल बागायतदार शेतकर्‍यांना चिंतेत टाकत आहेत.

दापोलीतून हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केट येथे रवाना झाली आहे. दापोली तालुक्यातील आंबवली बुद्रुक येथील आंबा बागायतदार मनोज केळकर यांनी आपल्या बागेतील 6 डझनांची हापूस आंब्याची पेटी वाशी येथील फळ मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविली आहे. तालुक्यातील आंबवली बुद्रुक हे गाव आंबा फळ पिकासाठी प्रसिध्द आहे. या गावात मोठ-मोठ्या आंबा फळबागा असून केळकर बंधूंनी गावातील रहिवाशांना रोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध करून दिले आहे. सकाळच्या सत्रात पडणार्‍या थंडीनेे बागायतदारांत समाधानाचे वातावरण आहे. पहाटे रत्नागिरी जिल्ह्यात पारा खाली येत असल्याने बर्‍यापैकी गारठा असतो. पुढील 15 दिवसांत हा गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पारा घसरल्याने आंब्याचा मोहोर परिपक्व होण्यास अनुकुलता निर्माण झाली आहे.

नियमित आंबा हंगामास मार्च उजाडणार

हापूस आंब्याची मुंबई – पुण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. फळबाजारात हापूस आंब्यांची तुरळक आवक सुरू झाली आहे. कोकणातून दररोज 10 ते 15 पेट्यांची आवक बाजारपेठेत सुरू झाली असली तरी हापूस आंब्यांचा हंगाम नियमित सुरू होण्यास मार्च महिना उजाडणार आहे. सध्या हापूसचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हापूस आंब्यांचा हंगाम सुरू होईल. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने हापूसची आवक वाढून दर सामान्यांच्या आवाक्यात येणार आहेत. यंदा हापूस आंबा लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. फळधारणा चांगली झाली असून, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंब्यांची नियमित आवक सुरू होईल, अशी माहिती येथील बागायतदार संतोष खाडे यांनी दिली.

Back to top button