सिंधुदुर्गात उद्यापासून हैद्राबाद-म्हैसूर विमानसेवा | पुढारी

सिंधुदुर्गात उद्यापासून हैद्राबाद-म्हैसूर विमानसेवा

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : चिपी परूळे येथील आयआरबी इन्फ्राने विकसित केलेल्या सिंधुदुर्ग विमानतळावरून बुधवार 1 फेब्रुवारीपासून अलायन्स एअरची दुसरी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईबरोबरच आता हैद्राबाद व म्हैसूर ही महत्त्वाची शहरे पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्याला विमानसेवेने जोडली जाणार आहेत. सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस ही विमानसेवा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरचे जनसंपर्क अधिकारी विवेक देवस्थळी यांनी दिली.

सिंधुदुर्गच्या विकासात भर टाकणार्‍या सिंधुदुर्ग विमानतळावरून गतवर्षीपासून अलायन्स एअरची सिंधुदुर्ग ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग अशी विमानसेवा आठवड्यातून पाच दिवस चालू आहे. आता या विमानतळावर नव्याने दुसरी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. या विमानतळावरून 1 फेब्रुवारीपासून आता दुसरे विमान उड्डाण करणार आहे. मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई ही विमानसेवा देणार्‍या अलायन्स एअर या कंपनीतर्फेच या हैद्राबाद-म्हैसूर-सिंधुदुर्ग-म्हैसूर-हैद्राबाद या दुसर्‍या विमानसेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या काळात दर बुधवारी आणि रविवारी अशी आठवड्यातून दोन दिवस ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल.

Back to top button