मालवण; कोरोनाची ‘कात’ टाकत मालवणच्या पर्यटनाला बहर | पुढारी

मालवण; कोरोनाची 'कात' टाकत मालवणच्या पर्यटनाला बहर

मालवण; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून राज्यातील बहुतांश सर्व व्यवहार, व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत. सिंधुदुर्गची पर्यटन राजधानी असलेल्या मालवण येथे कोरोनाची कात बाजूला सारत पर्यटन बहरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

येणाऱ्या पर्यटकांची सर्वाधिक पसंती सागरी पर्यटनाला दिसून येत आहे. वॉटर स्पोर्ट्स, पॅरासेलिंग, जेट्स स्की, बनाना रायडिंग, बोटिंग यासह स्कुबा डायव्हिंगला पर्यटकांचा ओघ दिसून येत आहे. या बरोबरच किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासही पर्यटनकांची पसंती दिसून येत आहे. मालवण दांडी बीच, चिवला बीच, बंदर जेटी यासह देवबाग, तारकर्ली व अन्य किनारपट्टीवर समुद्र स्नानसह पर्यटन सफारीचा आंनद पर्यटक लुटताना दिसत आहेत.

सुरक्षित पर्यटन ‘ही’ मालवणची ओळख

मालवणात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित पर्यटन सफर घडवणे याला मालवणातील पर्यटन व्यवसायिकांचे नेहमीच प्राधान्य असते. याबाबत पर्यटकही नेहमीच समाधान व्यक्त करतात. पर्यटकांच्या सुरक्षेलाच यापुढेही प्राधान्य असल्याचे पर्यटक व्यावसायिक सांगतात.

कोरोना नियमांचे पालन

कोरोना नियमांचे पालन करण्यात मालवण नेहमीच पुढाकार घेताना दिसून आले. कोरोनाच्या सुरवातीच्या काळातही सगळीकडे रुग्ण वाढत असताना मालवणात रुग्ण सापडून आले नाही. आजही पर्यटन सुरू झाले असताना कोरोना नियमांचे पालन करण्यात पर्यटन व्यावसायिक आग्रही दिसून येतात. पर्यटकांनाही कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन पर्यटन व्यवसायिकांकडून होत असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button