गोवा, कोकण पर्यटकांनी फुलला! | पुढारी

गोवा, कोकण पर्यटकांनी फुलला!

पणजी/रत्नागिरी/मालवण; पुढारी वृत्तसेवा : नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गोव्याला प्रथम पसंती असते, पण अलीकडे कोकण किनारपट्टीही पर्यटकांनी गजबजू लागल्या आहेत. गोवा, कोकणमध्ये देश-विदेशातील लाखो पर्यटक दाखल झाले आहेत.

सिंधुदुर्गातील मालवण, देवगड, वेंगुर्ले, शिरोडा आदी समुद्र किनार्‍यावर देश-विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील सर्वच हॉटेल फुल्ल झाली आहेत. गोव्यात नववर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्यांची धूम झाली आहे.

दापोली, गुहागर व रत्नागिरीत मोठ्या संख्येने पर्यटकांचा ओघ वाढला आहे. गोव्याला जाणारे पुण्या-मुंबईतील अनेक पर्यटक सध्या सुरक्षित अशा कोकणाला पर्याय देत आहेत. दापोली, गुहागर व रत्नागिरीतील समुद्रकिनार्‍यांवर पर्यटकांची संख्या वाढली आहे. रत्नागिरी तालुक्यात धार्मिक पर्यटनासाठीही पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. गणपतीपुळे, पावस अशा धार्मिक स्थानांना भेट देत आहेत. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातून गणपतीपुळे येथे पर्यटक दाखल झाले आहेत.

कोरोनानंतर मागील वर्षभरापासून येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढली आहे. गणपतीपुळे येथील हॉटेल फुल्ल झाली आहेत. त्यामुळे रत्नागिरीतही पर्यटकांचा ओघ वाढला आहे. रात्री उशिरापर्यंत पर्यटकांचा राबता वाढला आहे.

रत्नागिरीतील मांडवी, भाट्ये, आरेवारे यांच्यासह गणपतीपुळे येथील समुद्रकिनारे भरुन गेले आहेत. मत्स्यालय, थिबापॅलेस, नव्याने सुरु झालेल्या तारांगणालाही पर्यटक भेट देत आहेत.

देशातील पर्यटकांची सिंधुदुर्गकडे धाव

मालवण; पुढारी वृत्तसेवा : ख्रिसमस सुट्टी व इयर एन्डींग निमित्त मालवणसह जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीवर पर्यटकांची गर्दी पहावयास मिळत आहे. सुट्टीनिमित्त जगभरातील अनेक पर्यटक सिंधुदुर्गात मोठया प्रमाणात दाखल झाल्याने पर्यटन व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मालवणातील किल्ले सिंधुदुर्ग, बंदर जेटी परिसर, वायरी, तारकर्ली, देवबाग, तोंडवळी, तळाशील, रॉक गार्डन ही पर्यटन स्थळे गर्दीने फुलून गेली आहेत.

जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पर्यटकांची रेलचेल वाढली असून महाराष्ट्रासह देशातील विविध भागांतील पर्यटक मालवण, वेंगुर्ले, देवगड, विजयदुर्ग येथे दाखल झाले आहेत. गेली दोन वर्षे कोरोना, लॉकडाऊन व निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसाय मंदावला होता. यावर्षी मात्र ख्रिसमस निमित्त सिंधुदुर्गात पर्यटक दाखल झाल्याने पर्यटक व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. पर्यटक मालवणच्या समुद्रातील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी

प्रथम पसंती देत असून किल्ला दर्शनासाठी मालवण बंदर जेटीवर पर्यटकांची गर्दी होत आहे. तर मालवण दांडी, चिवला बीच, तारकर्ली , देवबाग, सुनामी आयलंड आदी ठिकाणी स्कुबा डायविंग व विविध वॉटरस्पोर्ट्सचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. पर्यटनाचा आनंद घेतानाच पर्यटक मालवणी जेवणावर देखील ताव मारत आहेत. जेवणासाठी विविध हॉटेल्स, रेस्टोरंट, खानावळी पर्यटकांनी फुलून गेल्या आहेत. मच्छी जेवणाला पर्यटक पसंती देत आहेत. तर मालवणची बाजारपेठ व बंदर जेटीसह इतरत्र असलेले विविध वस्तूंचे स्टॉल खाद्यपदार्थची दुकानेही पर्यटकांनी गजबजून गेली आहेत.

मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असल्याने पर्यटकांच्या गाड्यांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील रस्ते अरुंद असल्याने मोठ्या संख्येने आलेल्या वाहनांमुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण पडला आहे.

गोवा किनार्‍यांना अखंड जाग… बेधुंद जल्लोष

पणजी/म्हापसा/पेडणे; पुढारी वृत्तसेवा : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे जल्लोषात जंगी स्वागत करण्यासाठी लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. नववर्षाच्या स्वागताच्या पार्ट्यांची धूम सुरू झालेली आहे. पार्ट्यांतील वाद्यांच्या दणदणाटाने किनारपट्टी सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत अखंड जागी आहे.

बार्देश तालुक्यातील जगप्रसिद्ध कळंगुट समुद्र किनार्‍यासह कांदोळी, बागा, वागातोर, हणजूण, पेडणे तालुक्यातील आश्वे, मांद्रे, मोरजी, हरमल तसेच दक्षिणेतील पाळोळे, कोलवा, बाणावली आदी समुद्र किनारी देशी तसेच परदेशी पर्यटकांची जत्राच भरलेली आहे. संगीताच्या तालावर अनेक देशी-परदेशी पर्यटकांनी ताल धरलेला आहे. त्यांचे थिरकणे अन्य पर्यटक गटागटाने पाहत आहेत. शाकाहारी, मांसाहारी खाद्यपदार्थार्ंची प्रचंड रेलचेल आहे.

Back to top button