सिंधुदुर्गात भाजपचा धडाका; ठाकरे शिवसेना दुसर्‍या स्थानावर | पुढारी

सिंधुदुर्गात भाजपचा धडाका; ठाकरे शिवसेना दुसर्‍या स्थानावर

सिंधुदुर्ग; पुढारी वृत्तसेवा :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 325 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांपैकी यापूर्वीच 32 पंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 293 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच आणि सदस्यपदांसाठी मतदान झाले होते. यात भाजपने सर्वाधिक 178 जागांवर सरपंचपदी विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे सर्व आठही तालुक्यांत भाजप अग्रेसर राहिला. ठाकरे शिवसेनेचे 70, बाळासाहेबांची शिवसेनेचे 15, गाव पॅनलचे 54, अपक्ष 4 आणि राष्ट्रवादी 2 असे सरपंच विजयी झाले आहेत.

आ. नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कुडाळ मतदारसंघाचा विचार करता ठाकरे गटाच्या वैभव नाईक यांच्या मतदारसंघात भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. सावंतवाडी तालुक्यातही मंत्री दीपक केसरकर यांना आपला करिश्मा दाखविता आलेला नाही. याठिकाणीही भाजपने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्या. मात्र, बाळासाहेबांच्या शिवसेनेला फारसे यश मिळालेले नाही.

Back to top button