गुहागर शहर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आलेल्या धमकीच्या फोनमागे भाजपचा हात असू शकतो, असा आरोप आ. भास्कर जाधव यांनी केला आहे. सध्या देशामध्ये लोकशाही नसून हुकूमशाहीची भाषा सुरू आहे, अशीही टीका त्यांनी गुहागर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचे फोन येत आहेत, यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आ. जाधव यांनी भाजप पक्षातील नेत्यांचा समाचार घेतला. भाजपचे काही नेते दादागिरीची भाषा करत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली नाही तर विकास निधी देणार नाही, अशा धमक्या मतदारांना देत आहेत. त्यांचे हे वक्तव्य लोकशाहीविरोधी आहे. केंद्र सरकारचे प्रतिनिधी, राज्य सरकारमधील नेते यांच्याकडून अशी लोकशाहीची पायमल्ली होत आहे. त्यामुळे सध्या देशात लोकशाही राहिलेली नसून या पक्षाच्या नेत्यांनी हुकूमशाहीची व दादागिरीची भाषा वापरण्याची भूमिका घेतलेली दिसून येत आहे.