पालघर पोलिसांकडून विविध गुन्ह्यांतून 40 लाखांचा मुद्देमाल जप्‍त

पालघर पोलिसांकडून विविध गुन्ह्यांतून 40 लाखांचा मुद्देमाल जप्‍त
Published on
Updated on

पालघर; पुढारी वृत्तसेवा : पालघर जिल्ह्यातील चोरीच्या अनेक घटनांमधील मुद्देमालाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. विविध गुन्ह्यांतून या दोन महिन्यांत सुमारे 40 लाखांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. यामध्ये सोन्याचा साठा आणि मोबाईल टॉवरवरील बीटीएस कार्डचा समावेश आहे. या घटना जव्हार, केळवा सागरी पोलीस ठाणे आणि डहाणू परिसरात घडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांना आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत अपर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, गृह विभागाचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते, सहायक पोलीस निरीक्षक सतीश गवई तसेच अन्य अधिकारीवर्ग उपस्थित होता.

पोलीस अधीक्षक श्री. पाटील म्हणाले, पालघर जिल्ह्यात सध्या जन प्रतिसाद अभियान सुरू आहे. त्यानिमित्ताने संशयितांना शोधणे शक्य झाले आहे. केळवा येथे अर्धा किलो सोने मिळविण्यात पोलिसांना यश आले असून अजय पाटील, रा. नारंगी, मोठा तलाव विरार आणि मीरा रोड शांतीनगर येथील कुमार पुनार याला ताब्यात घेतले आहे. जव्हार येथील गुन्ह्यात पाच जणांना अटक केली असून यामध्ये लखन लक्ष्मण खंडागळे, उल्हासनगर, सत्यम सत्यभूत विश्‍वकर्मा, अंधेरी, सोनू रामूशंकर शर्मा, मालाड आणि संजय भारत कसबे, अंबरनाथ तसेच ज्यांच्याकडे हा माल जमा करीत होते तो अजमल खान, कुर्ला पश्‍चिम यांच्याकडून त्यांनी वापरलेल्या गाड्यांसह मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. यामध्ये मोबाईल टॉवरवरील 54 चिप आणि वायरलेस कम्युनिकेशनचे सामानाचाही समावेश होता.

6 लाख 48 हजार 314 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत

डहाणू किल्‍ला ब्राह्मणआळी येथील मिलिंद अरविंद करंदीकर यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील बेडरुममधील बाथरूमच्या काचा काढून त्यावाटे अज्ञात आरोपीने आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले 8 लाख 12 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिन्यांची चोरी केली. याबाबत डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून गुन्हगारांच्या मुसक्या आवळण्यात यश आले. चोरून नेलेल्या एकूण मुद्देमालापैकी 6 लाख 48 हजार 314 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात यश आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरतेश हारुगिरे करीत होते.

केळव्यात दोन आरोपींकडून अर्धा किलो सोने हस्तगत, 15 गुन्ह्यांची उकल

केळवा पोलीस ठाण्याच्या अखत्यारित असलेल्या खटाळी येथील जिग्‍नेश दीपक बारी हे नवरात्रीच्या आरतीसाठी दांडा खाडी येथे गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या बेडरुमची बंद खिडकी उघडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्‍कम मिळून 64 हजारांच्या मुद्देमालाची चोरी केली. हा गुन्हा 30 सप्टेंबर रोजी घडल्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांनी या अनुषंगाने तपास पथके तयार केली. पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी तयार केलेल्या जनसंवाद अभियानामुळे वरील नमूद गुन्ह्यात प्राप्‍त झालेले सीसीटीव्ही फुटेजमधील एक आरोपी हा स्थानिक नागरिकांच्या परिचयाचा असल्याचे निष्पन्‍न झाले. त्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून दोन आरोपींना ताब्यात घेवून त्यांची सखोल चौकशी करण्यात आली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. अधिक चौकशीअंती त्यांच्यावर केळवा पोलीस ठाण्यात 12 आणि सफाळे पोलीस ठाण्यात 3 असे एकूण 15 गुन्ह्यांची नोंद असल्याचे समजले. त्यांना अटक करून एकूण 15 लाख 8 हजार 600 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.

टॉवरवरील बीटीएस कार्ड चोरल्या, पाच आरोपींकडून 18 लाखांचा मुद्देमाल जप्‍त

जव्हार येथे एअरटेल कंपनीच्या मोबाईल टावरच्या बीटीएस कार्डची लाखो रुपयांची चोरी झाल्याची फिर्याद इंडस टॉवरचे फिल्ड ऑफीसर रिंकेश ठाकरे यांनी 3 ऑगस्ट रोजी नोंदविली. एअरटेल कंपनीचे एबीआयएचे तीन बीटीएस कार्ड, एएसमआयचे 1 बीटीएस, तर व्हीआय कंपनीचे 6-आरयूएस-02बीओचे बीटीएस कार्ड असे वर्णनाचे एकूण 1 लाख 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. या प्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हेता. यावेळी पोलीस अधिकारी आप्पासाहेब लेंगरे, उपनिरीक्षक जितेंद्र अहिरराव व जव्हार पोलीस ठाण्यातील अंमलदारांनी कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून सुमारे पाच संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यांच्याकडून अनेक गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्‍न झाले असून जव्हार पोलीस ठाण्यात दोन, विक्रमगड आणि शहापूर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावश आहे. या सर्व आरेापींकडून 18 लाख 10 सहजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सध्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या आधारे या गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून पालघर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आपापल्या हद्दीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. पालघर पोलीस दलाने आयोजित केलेल्या जनसंवाद अभियानाचाही उपयोग तपासाच्यावेळी कामी आला. सर्वच ठिकाणी कॅमेर्‍यांचे जाळे विणले जाणे आवश्यक आहे.
– बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news