कोकणातील चौपदरीकरण काम महिनाभरात सुरू | पुढारी

कोकणातील चौपदरीकरण काम महिनाभरात सुरू

रत्नागिरी ः भालचंद्र नाचणकर
मिर्‍या-रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या (क्र. 166) चौपदरीकरणाच्या कामाला महिनाभरात प्रारंभ होत आहे. मिर्‍या ते आंबा घाटापर्यंतच्या रुंदीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. येत्या दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी वसंत पंदेरकर यांनी ही माहिती दिली.

चौपदरीकरणासाठी 140.39 हेक्टर क्षेत्र संपादित करायचे आहे. त्यातील 129.92 हेक्टर क्षेत्र यापूर्वीच संपादित करण्यात आले आहे. 10.47 हेक्टर क्षेत्राचे संपादन बाकी आहे. संपादित केलेल्या संपूर्ण जागेमध्ये 20.10 हेक्टर जमीन शासनाच्या मालकीची आहे. मिर्‍या – रत्नागिरी – नागपूर चौपदरीकरणासाठी पाच वर्षांपूर्वी भूसंपादन प्रक्रिया झाली. हा मार्ग रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातून जात आहे. संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे, करंजारी, जंगलवाडी, दाभोळे, दाभोळे खुर्द, ओझरे बुद्रुक, दख्खीन, निनावे, साखरपा खुर्द, मुर्शी, कोंडगाव, मेढेतर्फे देवळे, साखरपा या 13 गावांमधील जागा संपादित करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील पाली, पाली बाजारपेठ, साठरे, खानू, हातखंबा, नाणीज, कारवांचीवाडी, पानवल, मधलीवाडी, झाडगाव, कुवारबाव, पडवेवाडी, नाचणे या 14 गावांमधील जागा संपादित करण्यात आली आहे. रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील सर्व गावांचे निवाडे घोषित करण्यात आले आहेत. शिल्लक 10.47 हेक्टर क्षेत्र संपादित करण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे.

आंबा घाटात दुपदरीकरण

मिर्‍या येथून सुरू होणारे रुंदीकरण 0 ते 8 कि.मी.पर्यंत दुपदरीकरण आणि पुढे 67 कि.मी.पर्यंत चौपदरीकरण आणि आंबा घाटात दुपदरीकरण केले जाणार आहे. रुंदीकरणासाठी ज्या जागा संपादित करण्यात आल्या आहेत, त्यातील घोषित मोबदला 731 कोटी 44 लाख रुपये इतका आहे. प्राधिकरणाला 438 कोटी 20 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 418 कोटी 64 लाख रुपयांचे वाटप झाले आहे. ज्यांच्या जागा संपादित करण्यात आल्या आहेत, ते 9 हजार 525 खातेदार असून त्यातील 6 हजार 209 खातेदारांना मोबदला वाटप झाला आहे. प्राप्त निधीपैकी 33 कोटी 99 लाख रुपये शिल्लक असून 293 कोटी 32 लाख रुपये प्राधिकरणाला मिळणे बाकी आहे.

एकाच वेळी तीन ठिकाणांहून काम

रत्नागिरी – संगमेश्वरातील 28 गावांमधून आंबा घाटापर्यंत जाणार्‍या या रस्ता प्रकल्पाची लांबी 56.80 कि.मी. इतकी आहे. एकाचवेळी या मार्गातील दोन ते तीन ठिकाणांहून कामाला प्रारंभ होणार आहे.

रत्नागिरी – नागपूर महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा प्रारंभ लवकरच होत आहे. या महामार्गामुळे परिसरातील गावांच्या विकासालाही गती येणार आहे. एकूणच हा महामार्ग विकासाचा महामार्ग ठरणार आहे. याविषयीची मालिका आजपासून…

Back to top button