सिंधुदुर्ग : चिंदर गावाची ही आहे अनोखी परंपरा..! गावाला आणि घराला निरोप दिल्याने गाव झालं सूनंसूनं | पुढारी

सिंधुदुर्ग : चिंदर गावाची ही आहे अनोखी परंपरा..! गावाला आणि घराला निरोप दिल्याने गाव झालं सूनंसूनं

आचरा (सिंधुदुर्ग), उदय बापर्डेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल साडेतीन हजार लोकवस्ती असलेले संपूर्ण चिंदर गाव गेल्या चार वर्षांनी गावकरी गावच्या वेशीबाहेर पडले. चिंदर गावातील लोक गाव सोडून जात आहेत. पुढील तीन दिवस सर्व गावकरी गावाच्या वेशी बाहेर राहणार आहेत. विशेष म्हणजे शाळा, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, कार्यालयातील कार्यरत शासकीय कर्मचारीही पुढील तीन दिवस सर्वच कामकाज बंद ठेऊन या ‘गावपळणी’मध्ये सहभागी  झाले आहेत.

सिंधुदुर्गात गेल्या तीनशेहून अधिक वर्षांपासून चालत आलेल्या ‘गावपळण’ या परंपरा आहे. तसेच मालवण तालुक्यातील चिंदरसारख्या साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या गावाला चिंदर येथे दर तीन वर्षांनंतर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी श्री देव रवळनाथाला कौल लावण्यात येतो. त्यावेळी श्री देव रवळनाथाने दशमी किंवा एकादशीच्या कालावधीत योग्य मुहूर्त पाहून ‘गावपळण’ पाळण्यात यावी, यास उजवा कौल मान्य करून चिंदर गावातील तब्बल साडेतीन हजारांहून अधिक लोकांनी शुक्रवारी १८ नोव्हेंबरच्या सायंकाळीपासून गाव वेशीबाहेर आपले जीवन सुरू केले आहे.

घरातील मंडळीबरोबरच पाळीव गुरेढोरे, कोंबडी, कुत्रे, पोपट, मांजर यांनाही आपल्या सोबत घेत चिंदरमधील अबालवृद्धापासून ते बालगोपाळापर्यंत साऱ्यांनीच उदरनिर्वाहचं नियोजन करून गाव वेशीबाहेर शुक्रवारी दुपारी ३ वा. पुढील तीन दिवसांच्या मुक्कामासाठी घरातून बाहेर पडले. घराच्या कुंपणावर काटेरी- शिरे ओडली जातात आणि पूर्ण गाव सोडले जाते. ‘गावपळणी’च्या निमित्ताने चिंदर गावातील जनसामान्यांना गावकुशीबाहेरचं जीवन जगण्यासाठी उत्साहात वातावरण असतं.

गावात राहणाऱ्या आपल्या नातलगांना भेटण्यासाठी येणाऱ्या मंडळींनाही पुढील तीन दिवसांसाठी गावबंदी असणार आहे. ‘गावपळण’च्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या चिंदरमधील प्रत्येकाचा मुक्काम आता वेशीच्याबाहेर तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या झोपड्यांमध्ये असणार आहे. या कालावधीत ही मंडळी घरातून आणलेल्या प्रापंचिक साहित्याव्यतिरिक्त अन्य कामात व्यस्त असताना दिसणार नाहीत.

तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा कौल लावण्यात येणार असून, त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मानवी जीवन यांत्रिकीकरणावर अवलंबून असताना सिंधुदुर्गातील आचरा, वायंगणी या गावांमध्ये ‘गावपळणी’ परंपरा पाळण्यात येतात. त्या येथील सर्वसामान्यासह शासकीय यंत्रणेला पाळणे तेवढेच बंधनकारक असते. अशा या परंपरेच्या माध्यमातून गाव कुशीबाहेर आगळ्या-वेगळ्या जीवनाचं हे दर्शन होते.

हेही वाचा  

Bhima Koregaon Violence : गौतम नवलखा यांना २४ तासात नजरकैदेत ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

भंडारा: जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर दगडफेड; एक गंभीर जखमी

कोल्हापूर : वाहने रोखली, जेवणही दिले; ‘स्वाभिमानी’ कार्यकर्त्यांनी जपली माणुसकी

Back to top button