कोकणात ऑरेंज अ‍ॅलर्ट, भारतीय हवामान खात्याचा अंदाज | पुढारी

कोकणात ऑरेंज अ‍ॅलर्ट, भारतीय हवामान खात्याचा अंदाज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे या भागातील घाटमाथ्यावर 15 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. उर्वरित राज्यात मात्र मध्यम पाऊस राहील.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात असलेला कमी दाबाचा पट्टा पुढील 48 तासांत उत्तर पूर्वेकडे सरकणार असून, त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे.

त्यानंतर हा पट्टा उत्तर पूर्व बंगालचा उपसागर ते उत्तर ओडिशा, पश्चिम बंगालकडे सरकेल.

त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांत या पट्ट्याचा प्रवास उत्तर ओडिशा आणि उत्तर छत्तीसगडच्या दिशेने होणार आहे.

याबरोबरच उत्तर पूर्व अरबी समुद्रापासून ते मध्यपूर्व बंगालचा उपसागर पार करून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडपर्यंत द्रोणीय स्थिती कायम आहे. मान्सून ट्रफ जैसलमेरवर आहे. या सर्व स्थितीमुळे राज्यात पाऊस सुरू आहे.

Back to top button