राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी छत्रपती शिवरायांना दिली मानवंदना! | पुढारी

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी छत्रपती शिवरायांना दिली मानवंदना!

रायगड, पुढारी वृत्तसेवा : ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपली सुवर्णपदक रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करत मानवंदना दिली. ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने देदीप्यमान कामगिरी केली असून, सुवर्ण कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूनी शनिवारी शिवाजी महाराज यांची राजधानी असणाऱ्या दुर्गराज किल्ले रायगडावर सुवर्ण चषक अर्पण केले.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने या नावीन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दुर्गराज किल्ले रायगडावर करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशने पथक प्रमुख प्रदिप गंधे ( मुंबई ), नामदेव शिरसागर, महासचिव निलेश जगताप, अमित गायकवाड, सोपान कटके, शिवाजी साळुंखे, संदीप वाळंजे, शिवाजी कोळी आदी उपस्थित होते.

३६ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन २७ सप्टेंबर ते १२ ऑक्टोंबर दरम्यान गुजरात येथे करण्यात आले होते. राष्ट्रीय क्रीडा स्पधेत देशातील ७००० हजार खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्राने देदीप्यमान कामगिरी करत तब्बल १३९ पदक मिळविली आहेत. महाराष्ट्र राज्याचे ६५० खेळाडूनी ३४ क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवला होता. या स्पधेत महाराष्ट्राने ३९ सुवर्ण ३८ रोप्य ६२ कांस्य अशी एकुण १३९ पदकांची लयलूट केली होती. गुजरात येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकून पहिला क्रमांक पटकावला होता. त्या बद्दल मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व खेळाडू प्रशिक्षकांचे अभिनंदन केले होते. या यशस्वी पथकात ज्योती व आरती पाटील या जुळ्या बहिणीनी स्विमिंगमध्ये सिल्वर आणि ब्राँज पथकाची कमाई केली. सॉफ्ट बॉल या नवीन क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक विजेत्या संघातील विष्णू जाधव प्रितीश पाटील हे खेळाडू उपस्थित होते.

  यावेळी माध्यमांशी बोलताना प्रदीप गंधे म्‍हणाले, “आम्हाला मिळालेले यश साहजिकच खेळाडूंच्या मेहनतीमुळेच आहेच पण त्याचबरोबर सर्व प्रशिक्षक, व्यवस्थापक यांच्या सुयोजनामुळे शक्य झाले आहे” उपप्रतोद प्रमुख अमित गायकवाड यांनी सुद्धा खेळाडूंवर सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनबद्ध अचूक कामगिरीचे हे यश असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देताना तो ब्रिटिशांचे प्रतीक गेटवे ऑफ इंडिया वर न देता छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर द्यावा, जेणेकरून तो पुरस्कार घेणाऱ्या खेळाडूस छत्रपती शिवरायांची प्रेरणा व विचारांचा आशीर्वाद मिळेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचलंत का?

Back to top button