रत्नागिरी : भाज्यांच्या चढ्या दराने ‘बजेट’ कोलमडले | पुढारी

रत्नागिरी : भाज्यांच्या चढ्या दराने ‘बजेट’ कोलमडले

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील भाजी मार्केटमध्ये श्रावण महिना सुरू होण्याआधीपासूनच वाढलेले भाज्यांचे दर दिवाळी तोंडावर आली तरी उतरण्याची चिन्हे नाहीत. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव काळात भाज्यांची मागणी वाढली होती. लांबलेला पाऊस आणि इंधनाचे वाढलेले दर यामुळे भाज्यांचे दर चढेच राहणार असल्याची शक्यता भाजी व्यापार्‍यांनी वर्तवली आहे.

घाऊक बाजारातच भाज्या महागल्याने किरकोळ बाजारात हेच दर 80 ते 100 रुपये किलोच्या घरात आहेत. त्यामुळे अर्ध्या किलोच्या जागी पाव किलो भाजी घेऊनच सर्वसामान्यांना समाधान मानावे लागत आहे. यावर्षी उन्हाळ्यापासूनच भाज्यांचे दर चढे राहिले आहेत. त्यानंतर अति पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले. भाजी खराब होत होती. तसेच, भाज्यांचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे बाजारात भाज्यांचे दर चढेच राहिले. आवक घटल्याने आणखी काही दिवस भाज्यांचे दर चढेच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरवर्षी श्रावणानंतर भाज्या स्वस्त होतात. यावर्षी मात्र ग्राहकांना चढ्या भावानेच भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत. गणेशोत्सव काळातही महागच भाज्या खरेदी कराव्या लागल्या. रोजच्या जेवणात हिरव्या मिरची आणि कोथिंबीरला मोठी मागणी असते. त्यानुसार बाजारात ज्वाला मिरची, लवंगी मिरचीला जास्त मागणी आहे. मात्र, घाऊक बाजारात सध्या मिरचीचे दर 60 रुपये किलो आहेत तर किरकोळ बाजारात 80 ते 90 रुपये किलो आहेेत. किरकोळ बाजारात कोथिंबिरीची जुडी 25 ते 30 रुपये झाली आहे.

सर्व भाज्यांचे दर 60 ते 100 रुपये किलो आहेत. भेंडी- 80, फरस बी- 80, फ्लॉवर- 15 ते 30, गवार- 60, घेवडा- 60, ढोबळी मिरची- 60, पडवळ- 60, शेवगा- 60, शिराळी दोडकी- 60, तोंडली- 60 रुपये किलोने विक्री होत आहेत. कांदा- 30, बटाटे 30 रुपये किलोने विक्री होत आहेत. बाजारात टोमॅटो चांगलाच भाव खात असून, किलामागे 50 रुपयांपर्यंत दर पोहोचले आहेत. वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

Back to top button