रत्नागिरी: महिला पोलिसाला शिवीगाळ; आरोपीला कारावासाची शिक्षा | पुढारी

रत्नागिरी: महिला पोलिसाला शिवीगाळ; आरोपीला कारावासाची शिक्षा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : लॉकडाउनच्या काळात जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर वाहतुकीस प्रतिबंध असतानाही लांजा बाजारपेठेत कार घेऊन फिरताना हटकल्याच्या रागातून महिला पोलीस कॉन्स्टेबल आणि अंमलदारास शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने सोमवारी (दि.३) एक महिन्याचा साधा कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

फकिर मोहम्मद हुसेन नेवरेकर (वय 35, रा.लांजा बाजारपेठ, रत्नागिरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात महिला पोलीस कॉन्स्टेबल सुगंधा हरेश दळवी यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानूसार, 23 मार्च 2020 रोजी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारची वाहतूक करण्यास शासनाकडून प्रतिबंध होता. तेव्हा आरोपी फकिर नेवरेकर हा आपल्या ताब्यातील स्वीफ्ट कार (एमएच-06-एएक्स-1212) मधून आपल्या मित्रासोबत लांजा बाजारपेठेत फिरत होता.

त्यावेळी महिला पोलीस कॉन्स्टेबल सुगंधा दळवी आणि त्यांच्या सोबत असलेल्या पोलीस अंमलदाराने नेवरेकरची कार थांबवून त्याला हटकले. याचा राग आल्याने नेवरेकर पोलिसांशी बाचाबाची करु लागला. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता.

याप्रकरणी फकिर नेवरेकर विरोधात जिल्हा दंडाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशाचा भंग केला म्हणून भादंवि कलम 353,352,332,294,188,270,271 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51(ब) सह साथिचे रोग अधिनियम1897 चे कलम 3 प्रमाणे दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला न्यायालयात सुरु होता. अतिरिक्त सरकारी वकील प्रफुल्ल साळवी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश एस.डी. बिले यांनी सोमवारी आरोपीला एक महिन्याचा साधा कारावास आणि 5 हजार रुपये दंड तो न भरल्यास 15 दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेश कदम यांनी काम पाहिले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button