मालकाचा व्हॉट्सअ‍ॅप डीपी ठेवून 8 लाखांना गंडवले; कांदिवलीतील घटना | पुढारी

मालकाचा व्हॉट्सअ‍ॅप डीपी ठेवून 8 लाखांना गंडवले; कांदिवलीतील घटना

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : व्हॉट्सअ‍ॅप डिपीवर मालकाचा फोटो ठेवून कंपनीच्या फायनान्स अधिकार्‍याला बँक खात्यात एकोणीस लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करुन पाऊणतासांत 8 लाखांची ऑनलाईन फसवणूक करणार्‍या रतेनकुमार उमेशकुमार सिंग, करुणकुमार बाळाशंकर सिंग या दोन बिहारी ठगांना उत्तर प्रादेशिक सायबर सेल विभागाच्य अधिकार्‍यांनी अटक केली. ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.

पोलिसांनी एक हार्डडिस्क, पंधरा एटीएम कार्ड आणि तीन बँकेचे पासबुक जप्त केले आहेत. तक्रारदार कांदिवलीतील एका खाजगी कंपनीत कामाला असून त्यांच्याकडे आर्थिक विभागाची जबाबदारी आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांना एका अज्ञात व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरून एक मॅसेज आला होता. डिपीवर त्यांच्या कंपनीच्या मालकाचा फोटो होता. मॅसेज वाचत असताना त्यांना एक कॉल आला. या व्यक्तीने आपण एक महत्त्वाच्या मिटींगमध्ये बिझी आहोत, त्यामुळे मॅसेजमध्ये पाठविलेल्या बँक खात्यात तातडीने 19 लाख रुपये पाठवा असे सांगितले. मॅसेज आणि कॉल कंपनीच्या मालकाचा असल्याचा समजूत त्यांनी काही वेळात कंपनीच्या बँक खात्यातून संबंधित बँक खात्यात 19 लाख रुपये पाठविले होते. त्यानंतर त्यांना आणखीन दहा लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात आले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी मालकाच्या पीएला फोन करुन ही माहिती दिली. यावेळी त्याने मालक कुठल्याही मिटींगमध्ये नसून त्यांनी असा कुठलाही मॅसेज पाठविला नसल्याचे सांगितले.

Back to top button