दापोली; पुढारी वृत्तसेवा : साई रिसॉर्टचे विजेचे बिल आ. अनिल परब यांच्या नावाने आहे. विभास साठे याने स्पष्ट म्हटले आहे की, मी अनिल परब यांना जमीन विकली. जागेचा बिनशेती आराखडा हा अनिल परब यांनी केला आहे. सदानंद कदम यांनी अनिल अरब यांच्याकडून हॉटेल विकत घेतले, असे लेखी लिहून देत आहे. या सगळ्याची उत्तरे देण्याची अनिल परब यांची हिंमत नाही, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. कथित साई रिसॉर्ट प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी गुरुवारी सोमय्या दापोली प्रांत कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी प्रांत अधिकारी, पोलिस अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी भाजपचे केदार साठे, तालुका अध्यक्ष मकरंद म्हदलेकर, श्रीराम इदाते, संदीप केळकर, प्रवीण झगडे, स्वरूप महाजन, नगरसेविका जया साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हे रिसॉर्ट तोडण्यासाठी जो कन्सल्टंट नेमायचा आहे तो दोन दिवसांत नेमला जाईल. आठवडाभरात तो आराखडा तयार करून देईल. नवरात्री दरम्यान पुन्हा एकदा निविदा काढली जाईल आणि त्यानंतर हे बांधकाम नवरात्रीत तोडले जाईल, असा दावा यावेळी सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या म्हणाले, पोलिस अधिकारी यांच्याशी मी सविस्तर चर्चा केली आहे. याबाबत अनिल परब यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी सोमय्या यांनी केली. महावितरणच्या अधिकार्यांनी सांगितले की, 5 मार्च 2020 रोजी अनिल परब यांनी रिसॉर्ट कन्ट्रक्शनसाठी वीजेचे मीटर घेतले आहे. परब यांनी लॉकडाऊन कोव्हिड काळात रिसॉर्ट बांधले, हे आता उघड झाल्याचे सोमय्या यांनी सांगितेले.
जे बिनशेती केले आहे, त्याची सुनावणी खेड न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे रिसॉर्ट तुटणार आणि अनिल परब यांच्यावर शंभर टक्के फौजदारी दाखल होणार, असा दावाही यावेळी सोमय्या यांनी केला. हे रिसॉर्ट पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग निविदा प्रक्रिया पूर्ण करून जिल्हाधिकार्यांकडे पाठविणार आहे. त्यांना मान्यता द्यावी लागणार, असे सोमय्या यांनी सांगितले.