सिंधुदुर्ग : अजस्र लाटांमुळे नौका उलटली; मच्छीमार बुडाला! ... दोघांना वाचविण्यात यश | पुढारी

सिंधुदुर्ग : अजस्र लाटांमुळे नौका उलटली; मच्छीमार बुडाला! ... दोघांना वाचविण्यात यश

मालवण; पुढारी वृत्तसेवा :  मच्छीमारी करून किनार्‍यावर परतत असताना समुद्राच्या अजस्त्र लाटांच्या तडाख्यात ‘मोरेश्वर कृपा’ नौका उलटली. सोमवारी सकाळी मालवण-देवबाग समुद्र किनारी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत देवबाग येथील विष्णू बळीराम राऊळ (55) हे मच्छीमार बेपत्ता झाले तर गौरव राऊळ व गंगेश राऊळ या दोघा मच्छीमारांना वाचविण्यात यश आले. या घटनेची माहिती समजताच प्रशासकीय यंत्रणनेने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

देवबाग संगम खाडी किनारा येथून सोमवारी सकाळी विष्णू बळीराम राऊळ (वय 55), गौरव विष्णू राऊळ (20), गंगेश उत्तम राऊळ (15, सर्व रा. देवबाग) हे मोरेश्वर कृपा वेतोबा प्रसाद या छोट्या मासेमारी नौकेने मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करून परत येत असताना अचानक समुद्रातील अजस्त्र लाटांच्या तडाख्यात सापडून ही मच्छीमारी नौका उलटली. यामुळे नौकेवरील तीनही मच्छीमार पाण्यात फेकले गेले. यात गौरव व गंगेश यांनी पोहत किनारा गाठल्याने ते बचावले. मात्र विष्णू राऊळ हे समुद्रात बुडून बेपत्ता झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस व महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. प्रांताधिकारी वंदना खरमळे, पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, तहसीलदार अजय पाटणे, पोलिस निरीक्षक विजय यादव, पोलिस पाटील भानुदास येरागी अन्य अधिकारी तसेच आजी माजी लोकप्रतिनिधी, मच्छीमार नेते उपस्थित होते.

पोलिस, महसूल, सागर रक्षक दलाचे सदस्य, मच्छीमार व ग्रामस्थ यांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या विष्णू राऊळ यांचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता, अशी माहिती मालवण पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या वतीने देण्यात आली आहे.

Back to top button