रत्नागिरी : जाधव-कदम यांची ‘हमरीतुमरी’; जिल्ह्यातल्या शिवसेनेत उभी फूट | पुढारी

रत्नागिरी : जाधव-कदम यांची ‘हमरीतुमरी’; जिल्ह्यातल्या शिवसेनेत उभी फूट

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचा बालेकिल्ला असणार्‍या रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन गटांत शिवसेना दुभंगली आहे. या पार्श्वभूमीवर युवा नेते आदित्य ठाकरे यांचा जिल्ह्यात दौरा झाला आणि निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यानंतर दापोलीत माजी मंत्री असलेले रामदास कदम यांनी मेळावा घेतला. या दोन्ही सभांच्या निमित्ताने मात्र राजकारण वैयक्तिक टीकेवर गेले आहे. अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत या मेळाव्यांमध्ये एकमेकांवर चिखलफेक झाली. यामुळे या सभांची जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु ‘विकासाकडे डोळेझाक करणार्‍या या सभा’ अशी सर्वसामान्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली येथे सभा घेतली. त्यांनी या सभेमध्ये शांत आणि संयमीपणाने वक्तव्ये केली. विशेषकरून फारशी कोणावर व्यक्तिगत टीकादेखील केली नाही. इतकेच काय चिपळूणमध्ये माजी आ. सदानंद चव्हाण यांचा नामोल्लेख देखील केला नाही. फक्त तिवरे धरण दुर्घटनेला स्पर्श करून जाताना खेकड्यांचे स्मरण केले आणि धरण खोदले तर काय-काय मिळेल, असा सवाल केला. परंतु त्यांनी या सभेत चव्हाण यांच्याविषयी व्यक्तिगत टीका टाळली. त्याच पद्धतीने दापोली आणि रत्नागिरीच्या सभेतदेखील बोलताना आपल्या चांगल्या वक्तृत्वाचे दर्शन घडविले. त्यांच्या वक्तृत्वात निश्चितपणे सुधारणा झाल्याचे या निमित्ताने सगळ्यांना जाणवले. मात्र, या उलट या सभांमध्ये अन्य वक्त्यांनी मात्र व्यक्तिगत टीका-टिप्पणी करीत चिखलफेक केली. आ. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांचे आई-बाप काढले. शिवसेनेत त्यांना नेतेपदी निवड केल्यानंतर जिल्ह्यातील ही पहिलीच सभा होती. मात्र दापोलीच्या सभेत रामदास कदम यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. आ. योगेश कदमांपेक्षा माजी मंत्री रामदास कदम यांच्याविरोधात त्यांनी आगच ओकली आणि ही टीका व्यक्तिगत पातळीवर गेली. या विरोधात रामदास कदम यांनी दापोलीत घेतलेल्या सभेतदेखील शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांचा एकेरी उल्लेख केला. मराठी भाषेतील काही अस्सल शब्द वापरून भास्कर जाधव यांचा एकेरी उल्लेख केला. त्यांनी या सभेत आ. जाधव यांचे आई-बाप काढले आणि व्यक्तिगत पातळीवर टीका केली.

एकेकाळी शिवसेनेमध्ये आ. जाधव व माजी आ. कदम या दोघांनीही विधानसभा गाजवली आहे. तोडीस तोड असे हे दोन्ही नेते आहेत. असे असताना या सभेच्या निमित्ताने वास्तविक त्यांनी कोकणच्या विकासात्मक प्रश्नांना हात घालणे आवश्यक होते. रखडलेले चौपदरीकरण, जिल्ह्यातील बागायतदार, मच्छीमार व्यावसायिकांचा प्रश्न, बंदर विकास, कोकण रेल्वेचे प्रश्न, उद्योग-व्यवसाय आणणे अशा विषयांवर भाष्य करणे गरजेचे होते. या निमित्ताने कोकण विकासाची चर्चा झाली असती. मात्र, दोन्ही नेते खरेतर शिवसेनेच्या जहाल विचारांच्या मुशीतून आल्याने सभा गाजविण्यासाठी त्यांनी वैयक्तिक टीकेचा आधार घेतला.

शिवसेनेची सभा जहाल विचार आणि भावनिकतेवर टिकते हे त्यांनी अनेक वर्षांच्या अनुभवातून शिकले आहे. मात्र, आता जनता विकासाला प्राधान्य देते, भावनेला महत्त्व देत नाही. परंतु दोन्ही नेते समकालीन असल्याने व्यासपीठावर त्यांनी ‘तूतू-मैंमैं’ केली. रामदास कदम यांनी तर गुहागर विधानसभेत गावागावांत जाऊन आ. भास्कर जाधव यांना पाडणार असा इशाराच दिला. मात्र, त्यासाठी भाजपचे माजी आ. विनय नातू यांची साथ मागितली. त्यामुळे आता राजकारण कोणत्या पातळीवर जाणार आहे याच अंदाज शिवसंवाद यात्रा आणि दापोलीतील कदम पितापुत्राने घेतलेला मेळावा यातून आला आहे. आगामी काळात शिवसेनेमध्ये निर्माण झालेले दोन गट परस्पर भिडणार आहेत याची ही नांदी आहे आणि एकाच पक्षातील दोन गटांना भिडवून भाजप त्याचा कसा फायदा उठविते हे राजकारण जिल्हावासीयांना पाहायला मिळणार आहे.

Back to top button