कोकणात मरीन, मँगो पार्क प्रकल्प उभारला जाणार : उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती | पुढारी

कोकणात मरीन, मँगो पार्क प्रकल्प उभारला जाणार : उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात येणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राजकीय घमासन सुरू असतानाच कोकणात मरीन आणि मँगो पार्क प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. या माध्यमातून कोकणातील पंचवीस हजार तरुणांना रोजगार मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, या प्रकल्पासाठी सुरुवातीला सव्वा दोनशे कोटी रुपये निधीची आवश्यकता असणार असून त्याबाबतची तरतूद करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात लहानलहान प्रकल्प उभारण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समुद्र किनारा मासेमारीच्या द़ृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. या दोन जिल्ह्यातून हजारो टन मासळी निर्यात केली जाते. या उद्योगाला आणखी गती देण्यासाठी येथे अत्याधुनिक मरीन पार्क उभे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या ठिकाणी मासळीवर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे हे मासे सुमारे वर्षभर टिकू शकतील. तसेच ते निर्यात करण्यासाठी या ठिकाणी जेटी उभारण्याचा विचार असल्याचे सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यात केवळ मरीन पार्क उभे करण्यात येणार नसून आंबा पार्क आणि काजू पार्क तयार करण्यात येणार आहे. या फळांवर प्रक्रिया उद्योगही उभारला जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात लोटे परशुराम एमआयडीसीच्या अंतर्गत सुमारे दीडशे ते दोनशे एकर जमिनीवर प्रकल्प करण्याचे प्रस्तावित होते. मात्र ही जमीन कमी पडणार आहे. निर्यातीच्या दृष्टीनेही गैरसोयीची ठरणार असल्याने रत्नागिरीतील जयगड नजीक सुमारे पाचशे एकर जमिनीवर मरीन पार्क, आंबा पार्क आणि काजू पार्क निर्माण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुरुवातीला सव्वा दोनशे कोटी रुपये निधीची आवश्यकता असणार असून त्याबाबतची तरतूद करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

Back to top button