रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : गणपतीपुळे पोलिस चौकीच्या मागील बाजूस किनार्यावरील 50 मीटर भाग रेड झोन ठरविण्यात आला आहे. या ठिकाणी पर्यटकांना पोहण्यासाठी मनाई केली असून, गृहरक्षक दल व पोलिसांसह जीवरक्षकांची करडी नजर येथे असणार आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी पर्यटकाला गणपतीपुळे किनार्यावरील स्थानिक व्यापार्याने जीव धोक्यात घालून वाचविले होते. सुमारे एक तासाहून अधिक काळ हा थरार सुरू होता. त्यानंतर काही दिवसांत सांगलीच्या दोन पर्यटकांना जीवरक्षकांनी वाचविले. पावसाळी वातावरणामुळे समुद्राच्या पाण्याला करंट असून, किनारी भागात लाटांचा जोर अधिक आहे. पर्यटकांनाही सुरक्षिततेसाठी आवाहन केले जाते; परंतु पर्यटक त्याकडे कानाडोळा करतात.
गणपतीपुळे पोलिस चौकीच्या मागील बाजूस पाण्यात चाळ (खड्डा) तयार होत आहे. भरती-ओहोटीच्या कालावधीत ही परिस्थिती निर्माण होते. त्यात पोहणारा पर्यटक सापडला की तो खोल समुद्राकडे ओढला जातो. सध्या पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने जयगड पोलिस ठाण्यातर्फे चाळ निर्माण होणारा परिसर पोहण्यास धोकादायक म्हणून 'रेड झोन' जाहीर केला आहे. सुमारे 50 मीटर हा भाग असून तेथे पर्यटकांनी पोहण्यास जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले. 'रेड झोन' दर्शविण्यासाठी लाल रिबीन बांधून ठेवण्यात आली आहे. तेथे दिवसभरात गृहरक्षक दलाचे दोन जवान नियुक्त केले आहेत.