रत्नागिरी : युनियन बँकेचे एटीएम फोडणारे सापडले 24 तासांच्या आत पोलिसांच्या जाळ्यात

रत्नागिरी : युनियन बँकेचे एटीएम फोडणारे सापडले 24 तासांच्या आत पोलिसांच्या जाळ्यात

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : चिपळूण येथे एटीएम मशीन फोडून लाखो रूपयांची रक्कम लंपास करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. भोगाळे परिसरातील परशुराम पार्क बिल्डींगमधील युनियन बँकेचे एटीएम मशीन फोडून तब्बल 14 लाख 60 हजार 500 रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली. चोरी झाल्यानंतर 24 तासांच्या आत टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. अटक केलेल्या तिघांकडून चोरीतील 4 लाख 5 हजार 290 रुपये, इन्होव्हा गाडी, तीन महागडे मोबाईल असा एकूण 14 लाख 85 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच संशयितांचे अन्य 2 साथीदार फरार असून, चोरीची उर्वरित रक्कम लवकरच हस्तगत करण्यात येणार असल्याची आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इरफान आयुब खान (वय 39,मुळ रा.उत्तर प्रदेश सध्या रा.कलिना मुंबई), वासिफ साबिर अली (वय 25, मुळ रा.उत्तर प्रदेश सध्या रा.मुंबई) आणि शादाब मकसुद शेख (वय 35, मुळ रा.उत्तर सध्या रा.सांताक्रुज, मुंबई) अशी पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या तिघांनी 31 ऑगस्ट रोजी पहाटे 4 ते 4.30 वाजताच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून चोरी केली होती.

याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात 1 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील 7 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 1 पोलीस उपनिरीक्षक आणि अनेक अनुभवी व निवडक पोलीस अंमलदार यांची 12 पथके तयार केली. यामध्ये अंगुली मुद्रा, डॉग स्कॉड, तसेच तांत्रिक विश्लेषण शाखा अशा कौशल्य असणार्‍या पोलिसांचाही समावेश होता. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजापूर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाला या गुन्ह्यातील संशयित गोव्याच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, या पथकांनी गोव्याला जाऊन संशयितांना ताब्यात घेत 24 तासात हा गुन्हा उघडकीस आणला.

संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी यापूर्वी रेकी करुन हा गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच यापूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचेही कबुल केले आहे. संशयितांनी परजिल्ह्यात आणि परराज्यात देखील अशा स्वरुपाचे गुन्हे केल्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने सुध्दा अधिक तपास करण्यात येत असून गुन्ह्याचा तपास चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी करत अल्याचे गर्ग यांनी सांगितले.

ही कामगिरी पोलीस अधक्षक मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधिक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, डॉ.सचिन बारी, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, रविंद्र शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, सुजिद गडदे, रत्नदिप साळोखे, मनोज भोसले, तुषार पाचपुते, संदीप पाटील, अमोल गोरे, पोलीस उपनिरीक्षक शाम आरमाळकर आणि या पथकांमध्ये असलेले रत्नागिरी जिल्हयातील सहाय्यक पोलीस फौजदार संजय कांबळे, पोलीस हवालदार विजय आंबेकर, सागळ साळवी, बाळू पालकर, प्रविण खांबे, मनोज जाधव, वृशाल शेटकर, संदीप मानके, महिला पोलीस हवालदार वेदा मोरे, पोलीस नाईक सत्यजित दरेकर, रमीज शेख, योगेश नार्वेकर, वैभव नार्वेकर, मनोज लिंगायत, रोशन पवार, उत्तम इंपाळ, करण देसाई, चालक पोलीस नाईक दत्तात्रय कांबळे, पोलीस शिपाई निलेश शेलार, कृष्णा दराडे, प्रमोद कदम , गणेश पाडवी, अजय कडू, रुपेश जोगी, वैभव ओहोळ, गणेश शिंदे व जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस अमंलदारांनी याचा तपास कार्यात समावेश आहे.  या गंभीर गुन्ह्याच्या तपासातील उत्कृष्ट कामगिरीबाबत पोलिस अधीक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग यांनी या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांचे विशेष अभिनंदन केलेले असून या तपास पथकाला रोख 25 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news