सांगली : पलूसमध्ये भरदिवसा घरफोडी; दीड लाखाचा मुद्देमाल लंपास | पुढारी

सांगली : पलूसमध्ये भरदिवसा घरफोडी; दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

पलूस; पुढारी वृत्तसेवा: पलूस स्टँडपासून अगदी जवळच असलेल्या साई कॉलनी या भागातील घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी केली. चोरट्यांनी अडीच तोळे सोने व घरातील रोख रक्कम असा दीड लाखाचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सुनिल पुदाले यांनी पलूस पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील पुदाले हे पंडित विष्णू दिगंबर हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. ते भाड्याच्या घरातच गेल्या चार वर्षांपासून आई, पत्नी, मुलासोबत राहत आहेत. शनिवारी (दि.3) सकाळी ८ च्या सुमारास ते कुटुंबासह सातारा येथे कामानिमित्त गेले होते. दरम्यान, रात्री साडेआठच्या सुमारास ते घरी आल्यानंतर दरवाजा उघडाच दिसून आला. कपाटातील कपडे अस्तव्यस्त पडले होते. सर्व सामान विस्कटलेले होते. किचनमधील सर्व साहित्य, डबे विस्कटून टाकले होते. तर कपाटात ठेवलेले २० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व इतर सोने असे २५ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेले.

या घटनेची माहिती मिळताच पलूस पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्हीचे फुटेज तपासले जात आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस धनवडे करीत आहोत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button