सिंधुदुर्ग : आंबोलीतील बटरफ्लाय पार्क पावसाळ्यानंतर सुरू करणार | पुढारी

सिंधुदुर्ग : आंबोलीतील बटरफ्लाय पार्क पावसाळ्यानंतर सुरू करणार

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : आंबोली येथे केरळच्या धर्तीवर उभारण्यात आलेला बटरफ्लाय पार्क पावसाळ्यानंतर सुुरू करण्यात येणार आहे. तसेच त्याच परिसरात प्रसिद्ध शास्त्रज्ञ मार्सेलिन अल्मेडा यांनी संग्रहित केलेले पानाचे विविध प्रकाराचा अभ्यास घडविणारे हार्बेरियम सेंटर उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी केली. आंबोली येथील अन्य पर्यटन प्रकल्प लवकरच सुरू केले जातील, त्यासाठी आवश्यक निधी आपण तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असेही केसरकर म्हणाले.

आंबोली येथील पर्यटन प्रकल्पांना केसरकर यांनी भेट दिली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, सरपंच सौ. सावित्री पालयेकर, उपसरपंच दत्तू नार्वेकर आदी उपस्थित होते. ना. केसरकर म्हणाले, या ठिकाणी उभारण्यात आलेले बटरफ्लाय पार्क कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्यात फुलपाखरे यावीत यासाठी पाण्याचे छोटे फवारे लावण्यात येणार आहे. अशा प्रकारचे पार्क केरळमध्ये आहे. त्यामुळे तेथील मॉडेल सिलेक्ट केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू करण्यात येेणार आहे. बुस्ट प्लान्टचे मेंटेनन्स करण्यात येणार आहे, स्वच्छता करण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर हे पार्क सुरू करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Back to top button