सिंधुदुर्ग : गौरी-गणपती विसर्जनापर्यंत ‘नो टेन्शन’ | पुढारी

सिंधुदुर्ग : गौरी-गणपती विसर्जनापर्यंत ‘नो टेन्शन’

कणकवली; पुढारी वृत्तसेवा :  पावसाने गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून दडी मारल्यामुळे मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केल्याचा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, ऐन गणेश चतुर्थी दिवशी सकाळच्या सत्रात कडाक्याचे ऊन लागत असताना दुपारनंतर पावसाने अचानक सुरुवात केली. ‘स्कायमेट वेदर’ या हवामानाचा अंदाज वर्तवणार्‍या खासगी संस्थेने 14 सप्टेंबरपर्यंत पाऊस कधी जोराचा तर कधी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविला आहे. या अंदाजानुसार कोकण पट्ट्यात 3 सप्टेंबरपासून कमी पाऊस होणार आहे. गौरी-गणपती विसर्जनापर्यंत ‘नो टेन्शन’ राहणार आहे. 3 ते 5 सप्टेंबर या कालावधीत पाऊसमान कमी राहणार आहे. 8 सप्टेंबरपासून काहीसा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून पर्यावरणाचे चक्र बदलत चालले आहे.

गेल्यावर्षी ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत पाऊस होता आणि शेवटच्या आठवड्यातही थंडीची चाहुल लागली होती. दरवर्षी साधारणतः 11 ते 20 सप्टेंबर या दरम्यान पावसाचा परतीचा प्रवास सुरू होतो. यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर झाले. जूनमध्ये काहीशी पावसाची कमतरता होती. मात्र, जुलै व ऑगस्टमध्ये पावसाने ही कमतरता भरून काढली आहे.

सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून या काळातील पावसाचा अंदाज घेतला असता 1 व 2 सप्टेंबरला कमी प्रमाणात पावसाच्या सरी कोसळतील. याच दरम्यान 1 सप्टेंबरला केरळच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. 3 सप्टेंबरपर्यंत पावसाचे प्रमाण काहीसे कमी होईल. 31 ऑगस्टला कोकणात घरोघरी श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. 5 सप्टेंबरला गौरी-गणपती विसर्जन आहे. स्कायमेट वेदरच्या अंदाजानुसार या कालावधीत पाऊस अत्यल्प राहणार असल्याने गौरी-गणपती विसर्जन कालावधी मोकळ्या वातावरणात पार पडणार आहे. मात्र, 6 तारीखपासून पावसाचा पुन्हा काहीसा जोर वाढणार असल्याचा अंदाजही स्कायमेटने व्यक्‍त केला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई, कोकण, गोव्यासह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्‍त करण्यात आली आहे.

Back to top button