रत्नागिरी : चिपळुणात गणेशोत्सवाची धामधूम | पुढारी

रत्नागिरी : चिपळुणात गणेशोत्सवाची धामधूम

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : कोकणात ‘घर घर गणपती’ची परंपरा कायम आहे. दोन वर्ष कोरोनामुळे गणेशोत्सवावर अनेक निर्बंध होते. मात्र, यावर्षी सर्व निर्बंध उठल्याने गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. कोकणातील प्रत्येक घराचे दार या निमित्ताने उघडले आहे.

कोकणात दोन उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गणेशोत्सव आणि शिमगोत्सव कोकणामध्ये महत्त्वाचा असतो. यानिमित्ताने मूळचे कोकणस्थित चाकरमानी हमखास आपल्या गावाला येतात. गणेशोत्सवात व शिमगोत्सवात अन्यवेळी बंद असणारी घरेदारे या उत्सवाच्या निमित्ताने उघडली जातात. घरांची साफसफाई केली जाते आणि अख्खं गाव फुलून जाते अशीच परिस्थिती सध्या कोकणातील गावागावात निर्माण झाली आहे. सभोवार हिरवीगार भातशेती, सजलेला निसर्ग, पालेभाज्या, फळभाज्यांची लयलूट आणि गणेशोत्सवामुळे आनंदाला आलेली भरती यामुळे कोकणातील प्रत्येक गाव आनंदून गेले आहे. यावर्षी तर दोन वर्षाची कमी भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. एसटी, खासगी बस, रेल्वेगाड्या खासगी वाहने घेऊन घरपट चाकरमानी दाखल झाले आहेत. कोकणात फारसे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होत नाहीत. मात्र, प्रत्येक घरामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. याउलट पश्चिम महाराष्ट्र व उर्वरित महाराष्ट्रात ‘एक गाव एक गणपती’ किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गणेशोत्सव साजरा होतो. मात्र, कोकणात घराघरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असतो. आरती, भजन, लोप पावत चाललेली पारंपरिक जाखडी आणि मनोरंजनाचे खेळ रंगतात. यानिमित्ताने महिलांमध्ये झिम्मा, फुगडी, गोफ हे पारंपरिक खेळ खेळले जातात.

त्यात यावर्षी गौरीच्या ओवशाचा मुहूर्त असल्याने महिलांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे गणपतीला येणार्‍यांची संख्या यावर्षी दुप्पट-तिपटीने वाढली आहे. गणेश चतुर्थीनंतर पुढील दहा दिवस घराघरात भक्तीमय वातावरण रंगणार आहे. वर्षभर कोकणातील गावे माणसांची प्रतीक्षा करीत असतात. कारण गावातील वाड्यावाड्यांमध्ये फक्त वृद्ध लोक राहतात तर तरूण कर्ते पुरुष मुंबई, पुणे व अन्यत्र नोकरीसाठी बाहेरगावी असतात. अनेकांची घरेदेखील वर्षभर बंद असतात.

Back to top button