रत्नागिरी : रुग्णवाहिकेचा रस्ता अडवला तर 10 हजारांचा दंड

file photo
file photo

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : अत्यवस्थ रुग्णांना दवाखान्यात नेणार्‍या रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करुन देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, तरीही रुग्णवाहिकेचा रस्ता अडविला तर संबंधितास 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. त्यामुळे वाहनधारकांनी या नियमांची कटाक्षाने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

शहरातून दवाखान्यापर्यंत पोहोचताना रुग्णवाहिका चालकांना मोठी कसरत करावी लागते. जागोजागी झालेल्या वाहतूक कोंडीतून रुग्णवाहिका बाहेर काढत रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविणे चालकांसाठी मोठे जिकिरीचे असते. अनेक ठिकाणी निर्माण होत असलेली ही परिस्थिती लक्षात घेऊन आता वाहतूक नियम कडक करण्यात आले आहेत. रुग्णवाहिका त्याचप्रमाणे आग आटोक्यात आणण्यासाठी जाणार्‍या अग्निशमन दलाच्या वाहनाचा रस्ता अडविला तर दंड लावण्याची तरतूद आहे. त्यामुळे प्रत्येकाने कर्तव्याचे आणि नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नवीन वाहन कायद्यात ही तरतूद केली असून, दंडाची रक्कमही वाढविली आहे. त्यामुळे नियम मोडणे परवडणारे नाही. रुग्णवाहिका, अग्निशमन बंब अडविल्यास दंडाची तरतूद असली तरी प्रत्यक्षात जिल्ह्यात अशा पद्धतीने एकाकडूनही दंड वसूल झालेला नाही.

रुग्णवाहिका असो की आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी जाणारा अग्निशमन दलाचा बंद, दोन्ही वाहने अत्यावश्यक सेवेत मोडतात. त्यामुळे यापैकी कोणत्याही वाहनाचा रस्ता अडविला तर दंड वसूल करण्याचा अधिकार वाहतूक पोलिस कर्मचार्‍यांना दिला आहे. वास्तविक पाहता, वाहनधारकांना शिस्त लागणे आवश्यक आहे. मात्र, वाहनचालक जागोजागी वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे एखादा मोठा अपघातही घडतो. मात्र, तरीही वाहनधारकांना शिस्त लागत नसल्याने आता दंडाची रक्कम वाढविली आहे.

शहरात सर्रास उल्लंघन

शहरातील प्रमुख मार्गावर वाहनांच्या गराड्यात रुग्णवाहिका अडकल्याचे चित्र अनेकवेळा पहावयास मिळते. विशेष म्हणजे रुग्णवाहिकेचा सायरन वाजविल्यानंतरही वाहने बाजूला होत नाहीत, त्यामुळे रुग्णवाहिका चालकाला वाहनाच्या गराड्यातून रस्ता काढताना कसरत करावी लागते. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असे प्रकार होतात. अशा वेळी वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन रुग्णवाहिकेला रस्ता करुन देणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news