मुलाचे अपहरण झाल्याच्या शंकेने आई कासावीस | पुढारी

मुलाचे अपहरण झाल्याच्या शंकेने आई कासावीस

दोडामार्ग; पुढारी वृत्तसेवा : गाडीवरून लिफ्ट देण्याचा बहाणा करून अज्ञाताने आपल्या लहान मुलाला पळविले असा महिलेने अंदाज बांधला व त्या मुलाची सर्वत्र शोधाशोध घेण्यास सुरुवात केली. तसेच या घटनेची माहिती येथील पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी व त्यांची टीम त्या मुलाच्या शोधाला लागली. तब्बल तीन तासांनंतर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांनी त्या मुलाचा शोध लावला व त्याला त्याच्या आईकडे सुपूर्द केले. यावेळी मुलाच्या चिंतेने व्याकुळ झालेल्या त्या महिलेच्या चेहर्‍यावरील आनंद गगनात मावेनासा होता.

सध्या राहणार गडहिंग्लज जि. कोल्हापूर व मूळची मांगेली येथील एक महिला स्कुटरने तिच्या 7 वर्षांचा मुलगा व 5 वर्षांची मुलगी यांच्यासमवेत सोमवारी दुपारी तिलारी घाटमार्गे मांगेली येथे जात होती. तिलारी घाट उतरत असताना एक अज्ञात दुचाकीस्वार आला. त्याने त्या महिलेला घाट रस्ता धोकादायक असून मुलाला लिफ्ट देऊ का? असे विचारले. मात्र, तो इसम अज्ञात असल्याने महिलेने त्याची मदत नाकारली. यावेळी अज्ञाताने महिलेला साटेली-भेडशी येथील दुकानदारांची नावे सांगितली व मी सावंतवाडीच्या दिशेने जाणार असून तुमच्या मुलाला त्या दुकानाकडे सोडेन असे सांगितले. ओळखीची नावे सांगितल्याने महिलेने त्या अज्ञातावर विश्वास ठेवून मुलाला त्या इसमासोबत पाठवले. तसेच सामानाच्या पिशव्यादेखील दिल्या. त्यानंतर सायंकाळी ती महिला साटेली-भेडशी येथे आली व त्या दुकानाजवळ जाऊन स्वतःच्या मुलाबद्दल विचारणा केली. मात्र त्या महिलेला तिचा मुलगा आढळून आला नाही.

मुलगा न मिळाल्याने त्या महिलेला काही सुचेना. ती सर्वत्र मुलाचा शोध घेऊ लागली. ही बातमी वार्‍यासारखी तालुक्यात पसरली. पोलिस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांना या घटनेची माहिती मिळताच ते टीमसह साटेली-भेडशी येथे दाखल झाले. महिलेकडून संपूर्ण माहिती घेत त्या मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. सायंकाळी उशिरापर्यंत मुलाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. पोलिस व स्थानिक ग्रामस्थ त्या मुलाच्या शोधात होते. मुलगा वायंगणतड येथे असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांना मिळाली, लागलीच ते तेथे पोहोचले. त्यानंतर त्या माय-लेकाची भेट घडवली. वायंगणतड येथे त्या मुलाची मावशी राहते. जेव्हा अज्ञात व मुलगा वायंगणतड जवळ पोहोचले, तेव्हा त्या मुलाने त्या अज्ञाताला मावशीकडे वायंगणतडला सोडण्याची विनवणी केली. त्यामुळे अज्ञाताने देखील मुलाच्या विनंतीवरून त्याला मावशीकडे सोडले व तो त्याच्या प्रवासाच्या दिशेने निघाला. या तपास कार्यात पोलिस व स्थानिकांनी विशेष मेहनत घेतल्याने तब्बल तीन तासांनंतर अखेर माय-लेकाची भेट झाली.

Back to top button