सिंधुदुर्ग : प्रेमसंबंधास नकार दिल्याने युवतीचा खून | पुढारी

सिंधुदुर्ग : प्रेमसंबंधास नकार दिल्याने युवतीचा खून

वेंगुर्ले; पुढारी वृत्तसेवा : वेंगुर्ले तालुक्यातील मठ-कणकेवाडी येथील सायली यशवंत गावडे या 20 वर्षीय बेपत्ता युवतीचा खून झाल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. वेंगुर्ले-मठमार्गे कुडाळ या मार्गावरील डाळसडानजीक आंब्याच्या बागेत निर्जनस्थळी सायली हिचा मृतदेह आढळून आला. ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने वेंगुर्ले तालुक्यासह मठ गावातील ग्रामस्थांना धक्का बसला आहे. या खूनप्रकरणी सायली हिच्या मैत्रिणीचा पती गोविंद ऊर्फ वैभव दाजी माधव (30, रा. परुळे) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती मिळाली आहे. प्रेमसंबंधास नकार दिल्याने हा प्रकार घडला असावा, अशी प्राथमिक माहिती पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.

सायली गावडे ही कुडाळ येथे खासगी दवाखान्यात नर्स म्हणून कामाला होती. ज्यादिवशी ती बेपत्ता झाली त्याअगोदर तिने घरच्यांना आपण जिजू सोबत येते, असे सांगितले होते. मात्र, ती घरी परतली नाही. दरम्यान, 27 ऑगस्ट रोजी कामावरून घरी न परतल्याने नातेवाईकांनी 28 ऑगस्ट रोजी रात्री वेंगुर्ले पोलिस स्थानकात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार वेंगुर्ले पोलिस तिचा शोध घेत होते. दरम्यान, तेथीलच एका ग्रामस्थाच्या नजरेस रविवारी रात्री तिचा मृतदेह पडला. वेतोरे-आडेली हद्दीत मठ कुडाळतिठानजीक एका आंब्याच्या बागेत तिचा मृतदेह होता. घटनेची वेंगुर्ले पोलिसांना माहिती मिळताच रविवारी रात्री 11.30 वा. वेंगुर्ले पोलिस निरीक्षक अतुल जाधव, सुरेश पाटील, योगेश वेंगुर्लेकर, बंटी सावंत, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके, अप्पर पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, एलसीबी पोलिस निरीक्षक संदीप भोसले, सहायक पोलिस निरीक्षक महेश घाग, एलसीबी टीम, वेंगुर्ले पोलिस टीम यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेऊन वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सायली हिच्या खुनामागे ‘जिजू’ म्हणजेच गोविंद ऊर्फ वैभव माधव असल्याचे पुढे आले. पोलिसांनी अटक केलेला संशयित गोविंद ऊर्फ वैभव दाजी माधव याची पत्नी ही सायली गावडेची मैत्रीण होती. यातूनच वैभव माधव व सायली हिची ओळख होती. वैभव याला ती जिजू असे म्हणत असे.

दरम्यान, सायली बेपत्ता झाल्यानंतर तिचे कुटुंबिय व नातेवाईक तिच्या फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते.मात्र, तिचा फोन लागत नव्हता. घटनेनंतर तिचा फोन निकामी करण्यात आला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.तिने प्रेमसंबंध नाकारल्याने ओढणीने गळा आवळून तिचा खून करण्यात आला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिच्या डोक्याला दुखापत, नाका-तोंडातून रक्त व हाताने मारहाण केल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. याबाबत मृत सायली हिचे वडील यशवंत लवू गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोविंद दाजी माधव याच्यावर भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सोमवारी अन्य तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्याचे समजते. या घटनेचा अधिक तपास डीवायएसपी रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलिस निरीक्षक अतुल जाधव, एलसीबी टीम व वेंगुर्ले पोलिस टीम करीत आहे. मृत सायली गावडे हिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच मठ-कणकेवाडी येथील ग्रामस्थ पोलिस स्थानक आवारात दाखल झाले होते. ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली व घटनेचा योग्य दिशेने तपास करण्यात यावा,अशी मागणी केली आहे.

Back to top button