रत्नागिरी : सागरी सुरक्षा – मच्छीमारच मोठा ‘गुप्‍तहेर’ | पुढारी

रत्नागिरी : सागरी सुरक्षा - मच्छीमारच मोठा ‘गुप्‍तहेर’

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : हरिहरेश्‍वर येथे किनापट्टीवर सापडलेल्या बोटींची माहिती मच्छीमारांकडून मिळाली. त्यामुळे मच्छीमार हाच मोठा ‘गुप्‍तहेर’ असून त्यांच्याकडून किनारपट्टीवरील महत्त्वपूर्ण माहिती मिळत असते. त्यामुळे मच्छीमार नौकांवर एआयएस (अ‍ॅटोमेटेड आयडेंटी फिकेशन सिस्टीम) ही यंत्रणा बसवण्याची गरज असल्याचे कोकण विभागाचे पोलिस महानिरीक्षक संजय मोहीते यांनी सांगितले. कोकण किनारपट्टीवरील सागरी सुरक्षा अधिक भक्‍कम करण्याची गरजही असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण दौर्‍यावर आलेल्या पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. देशाची गुप्‍तचर यंत्रणेकडून वारंवार किनारपट्टीच्या सुरक्षेबाबत माहिती दिली जात असते. किनारपट्टीवर नौदल, कोस्टगार्ड, कस्टम, पोलिस यांचीही गस्त असते. परंतु, मच्छीमार समुद्रात खोल आतपर्यंत कायम फिरत असतो. त्यांच्या नजरेत समुद्रातील हालचाली टिपल्या जात असतात. त्यांच्याकडूनच ही माहिती पोलिसांपर्यंत येत असते.

रायगडमध्ये हरिहरेश्‍वर येथे सापडलेली बोट फुटलेली होती. तिची माहिती मच्छीमारांकडूनच मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत त्यात पाणी शिरले होते. मात्र, स्थानिक मच्छीमारांनी त्यावरील कागदपत्रे व हत्यारे आणि साहित्य बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे बोटीची माहिती मिळवण्यात यश आल्याचे श्री. मोहिते यांनी स्पष्ट केले. सागरी पर्यटन करणार्‍या ऑस्ट्रेलियातील या व्यक्‍तीना वादळाच्यावेळी कोरियन जहाजाने वाचवले होते. ही बोटही ओढून नेली जात असताना रस्सी तुटल्याने भरकटली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.

सध्या सर्व लँडिंग पॉइंटवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवून सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचेही संजय मोहिते यांनी स्पष्ट केले. कोकणातील सागरी सुरक्षा अजूनही भक्कम करण्याची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ नौदल, तटरक्षक दल आणि पोलिस दलाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत समुद्रातील हालचालीची माहिती वेगाने सुरक्षा यंत्रणेला मिळण्यासाठी काय करता येईल, याचा विचार झाला.

समुद्रात हजारो मच्छीमारी नौका मासेमारीसाठी दिवस -रात्र असतात. यातील परकीय किंवा घुसखोरी करणारी नौका कोणती हे समजणेे कठीण आहे. म्हणून प्रत्येक मच्छीमारी नौकांवर एआयएस ही यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. यामुळे त्या-त्या बोटीच्या समुद्रातील मार्ग ट्रॅक करता येतो. परंतु बहुतेक नौकांवर एआयएस ही यंत्रणाच नाही. ही गंभीर बाब असून मेरिटाईम बोर्डाकडुन सर्व मच्छीमारी नौकांवर एआयएस यंत्रणा बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
किनार्‍यावरील घुसखोरी रोखण्यासाठी सर्व लँडिंग पॉइंटवर सुरक्षा रक्षक नेण्यात आले आहेत. परंतु त्यांनी ड्रेसकोड, ओळखपत्राचा प्रश्न आहे. महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडून हे सुरक्षा रक्षक नेमून त्यांच्याकडून थेट सुरक्षा यंत्रणेला माहिती मिळावी, यासाठी काम सुरू आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

सागरी सुरक्षेसाठी पोलिस कर्मचार्‍यांना ट्रेनिंग

पोलिस दलाची सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने मिरकरवाडा येथे कोस्टगार्डच्या मदतीने एक ट्रेनिंग सेंटर सुरू केले आहे. पोलिसांना याठिकाणी 8 ते 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये पोहणे, समुद्रात शस्त्र चालविणे, बचाव कार्य करणे आदींचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती श्री. मोहिते यांनी दिली.

 

Back to top button