रत्नागिरी : ‘जवानांच्या शौर्यकथा’ शिकणार विद्यार्थी; शालेय अभ्यासक्रमात कथांचा होणार समावेश | पुढारी

रत्नागिरी : ‘जवानांच्या शौर्यकथा’ शिकणार विद्यार्थी; शालेय अभ्यासक्रमात कथांचा होणार समावेश

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : बालवाडी, अंगणवाडी, इंग्रजी माध्यमातील प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर केजी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर सैन्य दलातील जवानांच्या शौर्य कथा शिकविल्या जाणार आहेत. या शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या मनावर देशभक्ती जागविण्याचा शासनाचा प्रयत्न असणार आहे.

भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. भारताची खरी ताकद युवा वर्ग आहे. यामुळे सशक्त आणि सुद़ृढ भारताचे स्वप्न असणार्‍या शालेय विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम जागृतीसाठी अभ्यासक्रमात बदल केला जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नवे शैक्षणिक धोरण राबवण्याची तयारी संपूर्ण देशभर करण्यात आली आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता शालेय अभ्यासक्रमात ‘जवानांच्या शौर्यकथांचा’ समावेश करण्यात येणार आहे. कोरोना संकटामुळे शाळा दोन वर्षे बंद होत्या. त्यामुळे नवे शैक्षणिक धोरण राबवणे सरकारला शक्य झाले नाही. आता पुढील शैक्षणिक वर्षांपासून नवा अभ्यासक्रम राबवला जाणार असल्याचे संकेत शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत युवा वर्ग अधिक आहे. युवा वर्ग जागरूक होत असल्याने भविष्यातील भारत बलशाली ठरणार आहे. देशात असणार्‍या बालवाडी, अंगणवाडी, इंग्रजी माध्यमातील प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर केजी,प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर सैन्य दलातील जवानांच्या शौर्य कथा शिकविल्या जाणार आहेत. या शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या मनावर देशभक्ती जागविण्याचा शासनाचा प्रयत्न असणार आहे. यामुळे विद्यार्थ्याचा संरक्षण क्षेत्राकडील कल वाढणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रति जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रमात जवानांच्या शौर्याचे धडे समाविष्ट करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या अभ्यासक्रमामुळे देशाच्या जवानांचा इतिहास कळणार आहे.

या अभ्यासक्रमाची मांडणी करण्यासाठी सशस्त्र दलांशी सल्लामसलत केली जाणार आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रमात जवानांचे धाडसी कार्य आणि सशस्त्र दलांमधील जवानांच्या बलिदान कथांचा समावेश केला जाणार आहे. अभ्यासक्रमात आधीपासूनच स्वातंत्र्योत्तर युद्धांतील वीर जवानांच्या शौर्यगाथांचा समावेश असल्याचे शिक्षकांनी सांगितले. परमवीर चक्र, अशोक चक्र यांसह युद्धात असाधारण कामगिरी करणार्‍या जवानांच्या कथा विद्यार्थ्यांना शिकवून प्रेरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात बदल होईलच असे नाही. मात्र त्यात नव्या काही शौर्यकथांचा समावेश केला जाऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले.

Back to top button