रत्नागिरी : गणेशोत्सवाला ठाकरे-शिंदे संघर्षाची किनार | पुढारी

रत्नागिरी : गणेशोत्सवाला ठाकरे-शिंदे संघर्षाची किनार

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी न चुकता कोकणात दाखल होतो. उत्सव साजरा करतानाच भविष्यातील गावाच्या भूमिकांवरही चर्चांना उधाण येते. याच कालावधीत अनेक ठिकाणी भविष्यातील राजकीय निर्णय होतात. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला असून सध्या राज्यात सुरू असलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यातील ‘तु तु मै मै’ चे पडसाद येथे उमटणार हे निश्चित आहे. चाकरमान्यांच्या उपस्थितीत बैठकाही रंगू शकतात. त्यामुळे यंदाच्या उत्सवावर ठाकरे-शिंदे गटातील राजकीय संघर्षाची किनार राहणार असल्याची शक्यता आहे.

कोकण आणि मुंबईचे नाते हे पूर्वांपार आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा कोकणातील लोकांमध्ये राजकीय प्रभावही आहे. त्याच जोरावर आजपर्यंत शिवसेनेनेही मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यावर वर्चस्व राहिले आहे. हेच मुंबईकर गेली अनेक वर्षे शिवसेनाप्रमुखांचा संदेश घेऊन कोकणातील गावागावांमध्ये फिरायचे. त्यामुळे निवडणुकांमधील दिशा ही उत्सवावेळी होणार्या बैठकांमधूनच ठरायची. जिल्हा परिषद, पंचायत समितीच नव्हे तर ग्रामपंचायतींचेही उमेदवार चाकरमान्यांना विश्वासात घेऊनच ठरवले जातात. अनेकवेळा विधानसभा निवडणुकीचे लगीनघाई सुरू झाली की चाकरमान्यांची फौज गावात उतरते. याचाच उपयोग शिवसेना कोकणातील वातावरण निर्मितीसाठी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या राज्यात शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे गटाने आव्हान दिले आहे. शिवसेना आमचीच हे दाखवण्यासाठी शिंदेची धडपड सुरू असून आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करत शिंदे गटावर कडाडून टीका करत आहेत. या परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचे दौरे झाले; मात्र रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही त्यांनी पाय ठेवलेला नाही. वातावरण निर्मितीसाठी ठाकरेंचे शिवसैनिक गणेशोत्सवातील बैठकांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणारच. भजने, आरत्यांबरोबर गावागावात होणार्‍या बैठकांमध्ये राजकीय दिशांवरही निर्णय ठरण्याची रित यावेळीही सुरू राहील. गावातील कार्यकर्त्यांनीही राची आखणी सुरू केली आहे. स्थानिक नेत्यांकडून बैठकांच्या तारखाही घेतल्या जात आहेत. रत्नागिरीसह खेड-दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघात हे वातावरण सर्वाधिक पाहण्यास मिळणार यात शंका नाही. त्यापाठोपाठ चिपळूण, लांजा-राजापूरवर प्रभाव राहील. गुहागरमध्ये अजूनही शिंदे गटाचा तेवढासा प्रभाव नाही. चाकरमान्यांमध्येही दोन तट असल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर ठाकरे-शिंदेंचा प्रभाव राहणार असल्याचे मानले जात आहे.

Back to top button