रत्नागिरी : रिफायनरी विरोधात गोवळमध्ये आंदोलन; महिला जखमी | पुढारी

रत्नागिरी : रिफायनरी विरोधात गोवळमध्ये आंदोलन; महिला जखमी

राजापूर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यतील गोवळ येथे रिफायनरी प्रकल्पासाठी करण्यात येत असलेल्या माती परीक्षण व सर्वेक्षण रोखण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी शनिवारी तीव्र आंदोलन केले. यात पोलिसांशी झालेल्या बाचाबाचीमध्ये एक महिला आंदोलक जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

गोवळ येथे सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ड्रोन आणि माती परीक्षणासाठी पोलिसांनी फौज फाटा तैनात केला आहे. परंतु, यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आंदोलकांनी आरोप केला आहे.

तालुक्यातील बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्पासाठी सर्व पक्षांमध्ये एकमत होत असतानाच स्थानिकांमधून मात्र विरोधाचा सूर सुरूच आहे. विरोधकांनी बारसू परिसरात प्रकल्पासाठी तीव्र लढा देण्याची तयारी केली आहे. गोवळ येथे सर्वेक्षण व माती परीक्षणासाठी अधिकारी येणार याची माहिती परिसरामध्ये शनिवारी सकाळी समजली. त्यानंतर गोवळ येथील ग्रामस्थ तातडीने सर्वेक्षण सुरू असलेल्या ठिकाणी जमू लागले. ग्रामस्थांची वाढती संख्या लक्षात घेता तत्काळ पोलिसफाटा वाढवण्यात आला. काहीवेळातच ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांना पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु आधी सर्वेक्षण रोखा अन्यथा आमचे आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. आक्रमक आंदोलनकर्त्यांना थोपवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. यात धक्काबुक्की होऊन एक महिला आंदोलक जखमी झाली. ड्रोन सर्वेक्षण आणि माती परीक्षण करणार्‍या कंपनीने गोवळ येथे झालेला विरोध पाहता काम थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्थानिकांनी देखील सध्या आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस यंत्रणा आणि कंपनीचे सर्व कर्मचारी माघारी फिरल्यानंतर गोवळ येथील ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

Back to top button