रत्नागिरी : चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी निधी द्या; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची विधानसभेत मागणी | पुढारी

रत्नागिरी : चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी निधी द्या; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची विधानसभेत मागणी

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : चिपळूण शहर कायमचे पूरमुक्त होण्यासाठी या भागातून वाहणार्‍या नदीतील गाळ काढणे आवश्यक आहे. शासनाने हा गाळ काढण्यासाठी अधिकचा निधी मंजूर करावा, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभा अधिवेशनात केली. आ. शेखर निकम यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर विरोधी पक्षनेते पवार यांनी ही मागणी जोर लावून धरली.

गतवर्षी चिपळुणात महापूर आल्याने हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. यानंतर झालेल्या उठावामुळे आघाडी सरकारच्या माध्यमातून वाशिष्ठी, शिव नदीतील गाळ काढण्यासाठी साडेनऊ कोटींचा निधी मंजूर झाला. यामुळे वाशिष्ठी व शिव नदीतील निम्मा गाळ काढण्यात आला. त्यानंतर पाऊस आल्याने हे काम अर्धवट राहिले आहे. याबाबत चिपळूण-संगमेश्वरचे आ. शेखर निकम यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निवेदन दिले व हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करण्याची मागणी केली. याची दखल घेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत चिपळूणच्या गाळाचा प्रश्न उपस्थित केला. गतवर्षी महाड आणि चिपळूणमध्ये महापूर आला. त्यामध्ये मोठी हानी झाली. वित्त आणि मनुष्यहानी देखील झाली. त्यामुळे चिपळूण आणि महाडला पुरापासून वाचविण्यासाठी तेथील नद्यांतील गाळ काढणे आवश्यक आहे. आघाडी सरकारने साडेनऊ कोटींच्या निधीच्या माध्यमातून निम्मा गाळ काढला आहे. गाळ काढण्यासाठी शासनाने तत्काळ निधी मंजूर करावा. वेळोवेळी याबाबत आपण प्रश्न मांडत राहू व शासनाला आठवण करून देऊ, असे आ. पवार यांनी सांगितले.

Back to top button