विजयदुर्ग : ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यातील पश्चिमेकडील असलेली तटबंदीचे दगड कोसळल्याने ही तटबंदी धोकादायक बनली आहे. गेले अनेक वर्षे समुद्राच्या लाटांचा मारा या तटबंदीवर होत असल्याने या तटबंद्या पायात कमकुवत होत आहेत. पश्चिमेकडील असलेली समुद्राकडील तटबंदीचे दगड कोसळल्याने तेथे मोठे भगदाड पडून तटबंदीचे वरील दगडही समुद्रात पडू लागले आहेत. यामुळे किल्ल्याची तटबंदी धोकादायक बनली आहे. याआधी किल्ल्याची तिहेरी तटबंदीतील दुसरी चिलखती तटबंदी पायाजवळून साधारण तीस ते चाळीस फूट खचल्याने या तटबंदीचा भाग मोठ्या प्रमाणात कोसळला होता. त्याचे काम अद्याप करण्यात आलेले नाही. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी किल्ल्याच्या ढासळत चालेल्या परिस्थितीबाबत केंद्रातील भारतीय पुरातत्व खात्याला किल्ल्याच्या डागडुजी आणि देखभालीसाठी पावले उचलण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्याचे वृत्त तेव्हा प्रसिध्द झाले होते.
छत्रपतींनी बांधली होती किल्ल्याला तिहेरी तटबंदी
राजा भोज याने बांधलेल्या या किल्ल्याची डागडुजी करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ल्याला तिहेरी तटबंदी बांधली होती. किल्ल्याच्या दक्षिणेकडील भागाकडील दर्याबुरजाचा खालील तटबंदीला मोठे भगदाड पडलेले आहे. हे भगदाड मोठे होत असून ही तटबंदी कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती आहे.