सिंधुदुर्ग : भुईबावडा घाटातून एकेरी वाहतूक सुरू | पुढारी

सिंधुदुर्ग : भुईबावडा घाटातून एकेरी वाहतूक सुरू

वैभववाडी; पुढारी वृत्तसेवा :  भुईबावडा घाटात कोसळलेली दरड जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली असून शनिवारी सायंकाळी घाटातून एकेरी वाहातूक सुरू करण्यात आली आहे.

भुईबावडा घाटात शुक्रवारी डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर पडला होता. मोठमोठ्या दगडीसह मोठ्याप्रमाणात मलबा कोसळला होता. शनिवारी दुपारपासूनच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात केली होती. सतत पडणार्‍या पावसामुळे डोंगरातून दगड माती रस्त्यावर येत असल्यामुळे कामात व्यत्यय येत होता. शाखा अभियंता कांबळे स्वतः उभे राहून काम करून घेत होते. शनिवारी सायंकाळी दरड हटवून एकेरी वाहतूक सुरू करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला यश आले.

भुईबावडा घाटात मोठी पडलेली दरड युद्धपातळीवर काढून सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक सुरू केल्यामुळे प्रवासी व वाहनचालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तर करुळ घाटातून हलकी वाहातूक सुरु झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, उपअभियंता व्ही.व्ही. जोशी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Back to top button