सिंधुदुर्ग : गद्दारांना भाजपच संपवेल : खासदार विनायक राऊत

सिंधुदुर्ग : गद्दारांना भाजपच संपवेल : खासदार विनायक राऊत

कणकवली; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या केवळ आमदार, खासदारांनाच त्यांनी फोडले नाही तर शिवसेना पक्ष संपवण्याचा भाजपचा कुटील डाव आहे. त्यासाठी त्यांनी गद्दारांना हाताशी धरले आहे. गद्दारांच्या हातात शिवसेना देण्याचा भाजपचा पुढील डाव आहे. मात्र, ते आपल्याला कदापिही होऊ द्यायचे नाही. ज्यांनी गद्दारी करून भाजपला साथ दिली आहे, त्यांनाही ते अडीच वर्षांनंतर गारद करतील. ज्यावेळी शिवसेना संपेल त्यावेळी मराठी माणूस संपेल. त्यामुळे शिवसैनिकांनी संघटितपणे या संघर्षाच्या काळात एकजूट दाखवून तळागळात पक्ष मजबूत करण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे खा. विनायक राऊत यांनी केले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावरही बोचरी टीका केली.

कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि प्रमुख पदाधिकार्‍यांचा मेळावा शनिवारी भगवती मंगल कार्यालयात झाला. शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, प्रदीप बोरकर, आ. वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर, अतुल रावराणे, बाळा गावडे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी प्रमुख निलम पालव, उपजिल्हा प्रमुख राजू शेटये, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, डॉ. प्रथमेश सावंत, वैभववाडी तालुका प्रमुख मंगेश लोके आदी उपस्थित होते.

खा. विनायक राऊत म्हणाले, आम्हाला दोन दगडांवर पाय ठेवणारे कार्यकर्ते नकोत तर पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष बळकट करणारे कार्यकर्ते हवेत. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली ही शिवसेना संपवणारी औलाद अजून जन्माला यायची आहे. मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, पालीच्या घरात बसून माजी पालकमंत्री सामंत घाणेरडे राजकारण करत आहेत. जिल्ह्यातील शिवसेना फोडण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांना जनता माफ करणार नाही. उदय सामंत यांनी अडीच वर्षांच्या पालकमंत्री पदाच्या काळात राणेंच्या लोकांना पोसण्याचे काम केल्याचा आरोप खा. राऊत यांनी केला. चिपी विमानतळावर दुसरी विमान फेरी सुरू करण्याची मागणी आपण 18 जुलैला दिल्लीत झालेल्या एव्हीएशन कमिटी बैठकीत केली होती. त्यानुसारच ही दुसरी विमान फेरी सुरू होत आहे. त्याचे श्रेय आ. नितेश राणे यांनी घेवू नये, असे खा. राऊत म्हणाले. अगामी जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेऊन प्रत्येक जि.प. मतदारसंघात किमान 2 हजार सदस्य नोंदणी करणार्‍यांचाच उमेदवारीसाठी विचार केला जाईल, असे खा. राऊत म्हणाले.

आ. वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्गात शिवसेना भक्कम असून कार्यकर्त्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता एकजुटीने संघटना बळकटीसाठी काम करावे. उपनेते गौरीशंकर खोत यांनी जनतेच्या मनातील शिंदे गटाबद्दलची नाराजी मतात रुपांतर करण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागावे, असे आवाहन केले. संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी खा. राऊत यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघ समन्वयक पदी सतीश सावंत, बाळा भिसे, कुडाळ-मालवण मतदारसंघ समन्वयकपदी संदेश पारकर, संग्राम प्रभूगावकर, सावंतवाडी मतदारसंघ संपर्क प्रमुखपदी अतुल रावराणे, बाळा गावडे यांची नियुक्ती जाहीर केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news