सिंधुदुर्ग : सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपचेच आमदार; अजयकुमार मिश्रा यांचा दावा | पुढारी

सिंधुदुर्ग : सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपचेच आमदार; अजयकुमार मिश्रा यांचा दावा

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून खासदार आणि सहाही आमदार भाजपाचे असतील, अशी पक्ष बांधणी शक्ती केंद्र व बुथ समितीच्या माध्यमातून विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे, असा विश्वास केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केला. यंग इंडिया कंपनीच्या माध्यमातून काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळेच ते भाजपावर टीका करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुका विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी लोकसभा प्रवास योजना अंतर्गत शक्तिकेंद्र प्रमुख व बुथ समिती अध्यक्ष संघटनात्मक बैठक केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपचे संयोजक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब,शेलैंद्र दळवी, लखमराजे भोसले, रणजित देसाई, राजेंद्र म्हापसेकर, प्रमोद कामत, संध्या तेरसे, राजू राऊळ, एकनाथ नाडकर्णी, चंद्रकांत जाधव, विकास केरकर आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक जिल्हा संयोजक महेश सारंग यांनी केले. गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा म्हणाले, मागील तीन दिवसांपासून सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपाची लोकसभा प्रवास योजना माध्यमातून फिरत आहे. शक्तिकेंद्र व बुथ समितीच्या माध्यमातून संघटना बांधणी मजबूत करण्यात आली आहे. आज परतीच्या प्रवासात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बैठकीत उपस्थित राहिल्यावर खासदार आणि सहाही विधानसभा मतदारसंघातून आमदार विजयी होतील. तसेच येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचा विजय होईल. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शक्तिकेंद्र प्रमुख व बुथ समिती सदस्य बांधणी संयोजक महेश सारंग व सहकार्‍यांनी करत आजचा लोकसभा प्रवास योजनांतर्गत घेतलेल्या बैठकीचे कौतुक गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केले. आभार प्रदर्शन लखमराजे भोसले यांनी केले. आणि सूत्रसंचालन विकास केरकर यांनी केले.

Back to top button