रत्नागिरी : शिवसेनेच्या आजी-माजी आमदारांना खासदार विनायक राऊतांनी दिली समज

रत्नागिरी : शिवसेनेच्या आजी-माजी आमदारांना खासदार विनायक राऊतांनी दिली समज

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : चिपळूणमध्ये आ. भास्कर जाधव व माजी आ. सदानंद चव्हाण यांनी स्वतंत्र मेळावे घेतले. या मेळाव्यात काही चुकीच्या घटना घडल्या. याची आपल्याला माहिती मिळाली. त्याची तातडीने दखल घेत आपण संबंधितांना सूचना दिल्या आहेत व यापुढे असे प्रकार घडू नयेत याची खबरदारी घ्यावी. आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये पक्ष संघटना व कार्यकर्ते जपणे आपले काम आहे. खासदार म्हणून आपण, आ. भास्कर जाधव, माजी आ. सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, संपर्कप्रमुख यांनी सर्वांना एकसंध ठेवण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे, अशा भावना खा. विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.

चिपळुणात आ. भास्कर जाधव, माजी आ. चव्हाण यांचे दोन स्वतंत्र मेळावे झाले. या मेळाव्यात मानपानावरून झालेला मुद्दा रंगला. या पार्श्वभूमीवर खा. राऊत यांना विचारले असता, शिवसेना संघटना मजबूत आहे. कार्यकर्त्यांची संघटनेला साथ मिळत आहे. विशेषकरून सर्वसामान्य लोक सेनेबरोबर आहेत. आगामी न.प., जि. प., पं. स. निवडणुकीसाठी आपण चिपळुणात आलो आहोत. चिपळुणातील प्रत्येक प्रभागात जाऊन कार्यकर्त्यांशी बोलणी करणार आहोत. आघाडीचा निर्णय स्थानिक पदाधिकार्‍यांनी घ्यायचा आहे. जो न्यायालयीन लढा सुरू आहे त्यात शिवसेनाच यश मिळवेल. शिवसेना चिन्ह व पक्ष उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडेच राहील असा ठाम विश्वास व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाबद्दल ते म्हणाले, भाजपने ज्यांच्यावर आधी आरोप केले ते अब्दुल सत्तार, संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे. भाजपमध्ये प्रवेश करा, आंघोळी करा आणि शुद्ध व्हा असा हा प्रकार आहे. एकेकाळी या लोकांना भाजपने आरोपीच्या कठड्यात उभे केले होते. मात्र, आता भाजपचे नेते या लोकांबरोबर बसणार आहेत, अशी टीकाही केली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेतृत्व कोणाचे देणार यावर ते म्हणाले, या ठिकाणी आजी-माजी आमदार आहेत, जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वावरच या निवडणुका होतील. जर कोणाला स्वतंत्र नेतृत्व करायचे असेल तर त्यांनी पक्षप्रमुखांकडे जायला हवे. माजी आ. चव्हाण यांनी तशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करावी. राज्यात अनेकजण अशाप्रकारची मागणी पक्षप्रमुखांकडे करतात व त्याला ती विश्वासाने दिली जाते. त्यामुळे त्यांनी पक्षप्रमुखांकडे मागणी करावी असा सल्लाही खा. राऊत यांनी दिला. आगामी निवडणुकीत आपण यश मिळविणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news