ठाणे : सामंत, केसरकरांमुळे कोकण विकासाला गती | पुढारी

ठाणे : सामंत, केसरकरांमुळे कोकण विकासाला गती

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : कोकणात सावंतवाडीतून दीपक केसरकर, रत्नागिरी उदय सामंत, डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली असताना इच्छुकांत सर्वात आघाडीवर असलेले नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे, रायगडचे भरत गोगावले, पनवेलचे प्रशांत ठाकूर, मुरबाडचे किसन कथोरे यांचा पत्ता कट झाला, त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात कभी खुशी कमी गम पाहायला मिळत आहे.

मुंबईसह कोकणातून 75 आमदार आहेत. एवढी संख्या असलेल्या आमदारांपैकी केवळ 5जणांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे पुढील विस्तारावर कोकणचे विशेष लक्ष असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शिवसेनेचे 2 तर भाजपचे 1 आणि शिवसेनेचे 2 आमदार निवडून आले होते, त्यातील शिवसेनेचे एक आमदार दीपक केसरकर हे शिंदे गटात आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपदही मिळाले. मात्र, शिंदे गटाला न्याय देताना भाजपचे मूळ नितेश राणेंचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे मूळ भाजपात नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे उदय सामंत यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली आहे, त्यामुळे रत्नागिरीचे पालकमंत्रिपद शिंदे गटाकडे जाणार, हे स्पष्ट झाले आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद पुन्हा एकदा शिंदे गटाकडे जाणार आहे. मुंबईत शिंदे गटाच्या एकाही आमदाराला मंत्रीपद मिळालेले नाही. या मागे शिवसेनेला बरोबर घेण्याची नीती असल्याचे बोलले जाते. मुंबई या बलाढ्य महापालिकेची निवडणूक तोंडावर असतांना भाजपाच्या मंगलप्रभात लोढा या एकमेव आमदारांना मंत्रीपद मिळाले आहे. मुंबईत 36 आमदारांचे संख्याबळ आहे, यात भाजपाकडे 16, शिवसेनेकडे 14, काँग्रेस-4, राष्ट्रवादी – 1, समाजवादी पक्ष -1 असे संख्याबळ आहे. शिवसेनेचे 14 पैकी 5 आमदार शिंदे गटाकडे असतांना एकाला मंत्रीपद मिळाले आहे.

ठाणे जिल्ह्यात 18 आमदारांचे संख्याबळ आहे, यात भाजपा 7 तर शिंदे गटाकडे 6 आमदार आहेत. उर्वरित 5 आमदारांपैकी 1 अपक्ष आमदार गीता जैन, राष्ट्रवादी काँग्रेस 2, सपा- 1, मनसे -1 असे संख्याबळ आहे. यामध्ये आजच्या विस्तारात एकाला मंत्रीपद मिळालेले आहे, शिंदे गटात गेलेले आणि ईडीच्या कचाट्यात सापडलेले यांचा पत्ता यावेळी कट झाला आहे. भाजपाकडून इच्छुक असलेले संजय केळकर, किसन कथोरे यांचाही पत्ता कट झाला आहे, किसन कथोरेंना महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर भाजपने विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार केले होते, त्यावेळी त्यांच्याकडे बहुमत नव्हते, मात्र आता बहुमत आले त्यावेळी मात्र त्यांना कुठलीच संधी मिळाली नाही, त्यामुळे नाराजीचा सूर उमटू शकतो. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तिन्ही आमदार मोठ्या अपेक्षेने शिंदे गटात गेले, यात भरत गोगावले हे तीन वेळा विजयी झालेले आमदार आहेत, त्यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती, मात्र यावेळी त्यांची संधी हुकली आहे. 2014मध्ये सेना – भाजपा युतीचे सरकार आले त्यावेळी रायगडचे पालकमंत्रीपद भाजपाकडे होते. त्यावेळी रवींद्र चव्हाण राज्यमंत्री होते, आता त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला कारण शिंदे गटाच्या फुटीच्या वेळी रवींद्र चव्हाण यांची मोलाची भूमिका होती, त्याचे पारितोषिक त्यांना देण्यात आले, त्यांना रायगडचे पालकमंत्रीपद पुन्हा मिळेल, अशी शक्यता आहे.

ठाण्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे. 1999 मध्ये मुख्यमंत्री झालेल्या नारायण राणेंनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री आपल्याकडे ठेवले होते, या फॉर्मुला यावेळीही लागू होवू शकतो. दुसर्या बाजूला सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद दीपक केसरकरांना तर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे जाणार, हे नक्की असल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाला संधी मिळणार आहे. मुंबई मंत्रीपद न देण्यामागे नवी राजकीय रणनीती असल्याचे सांगितले जाते. यामध्ये सरकार स्थिर करण्याच्या दृष्टीने शिवसेनेला बरोबर घ्यायचे झाल्यास मुंबईची पदे रिक्त ठेवणार्या भर दिला गेला आहे.

Back to top button