सिंधुदुर्ग : देवगड बंदरात नांगरलेली मच्छीमार नौका कलंडली | पुढारी

सिंधुदुर्ग : देवगड बंदरात नांगरलेली मच्छीमार नौका कलंडली

देवगड; पुढारी वृत्तसेवा :  देवगड बंदरात नांगरून ठेवलेली ‘अल मदने’ ही नौका सी कॉक फुटून पाणी आत गेल्याने पाण्यात कलंडली. यामध्ये नौकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही नौका आचरा येथील अमित गावकर यांच्या मालकीची आहे. सोमवारी ही बाब लक्षात आली.

देवगड बंदर सुरक्षित असल्याने गेली चार वर्षे आपल्या मालकीची नौका अमित गावकर देवगड बंदरातच नांगरून ठेवत होते. बंदी कालावधीत ही नौका यंदाही अमित गावकर यांनी देवगड बंदरात नांगरून ठेवली होती. मात्र या नौकेचा सी कॉक फुटल्याने ही नौका कलंडली. वादळ सदृश्य व पावसाचे वातावरण निवळल्यावर ही नौका किनार्‍यावर आणून दुरुस्ती केली जाणार आहे. या नौकेचे इंजिनच पाण्यात बुडाल्याने या नौकेचे फार मोठे नुकसान झाले आहे. नौका पाण्यात असल्याने प्रत्यक्ष पंचनामा होऊ शकला नाही. मात्र, या नौकेची मत्स्य व्यवसाय खाते व पोलिस खाते यांनी पाहणी केली आहे.

Back to top button