रत्नागिरी : जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी | पुढारी

रत्नागिरी : जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी

खेड; पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील ग्रामीण भागात सोमवार, दि. 8 रोजी पावसाची संततधार सुरूच असून, जगबुडी नदी 7.5 मिटर इतकी धोक्याच्या पातळीवर वाहत असून नदीकिनारी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या हलक्या ते मुसळधार सरींमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

खेड तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने धुवाँधार हजेरी लावली आहे. तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील नदी किनार्‍यालगतचा बंदर मार्ग पाण्याखाली गेला आहे. नदी किनार्‍यावरील शहरातील मटण मच्छीमार्केटला जगबुडी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास खेड बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने बाजारपेठेतील व नदी किनार्‍यावर वास्तव्य करणार्‍या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या चोवीस तासांत खेड मध्ये 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, दि. 8 रोजीपर्यंत 1790 मिलीमीटर एव्हडी नोंद झाली आहे. नारिंगी नदीला आलेल्या पुराचे पाणी खेड – दापोली मार्गावर सुर्वे इंजिनिअरिंग या ठिकाणी रस्त्यावर आल्याने या मार्गावरून वाहतूक ठप्प झाली आहे.

Back to top button