रत्नागिरी : आंजणारी येथील दत्तमंदिर पाण्याखाली | पुढारी

रत्नागिरी : आंजणारी येथील दत्तमंदिर पाण्याखाली

लांजा; पुढारी वृत्तसेवा :  तुफानी कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे काजळी नदीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे तर आंजणारी मठ येथील स्वयंभू श्री दत्त मंदिर पुन्हा एकदा पाण्याखाली गेले आहे. सोमवारी 8 ऑगस्टला सकाळी 11 वाजल्यापासून आंजणारी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. पुलावरून वाहतूक बंद करण्यात आल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल पाच तासांनंतर सोमवारी सायंकाळी चार वाजता आंजणारी पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली.

जुलै महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात पूर्णपणे पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे पाऊस गायब झाल्याच्या भीतीने शेतकरी वर्ग देखील चिंतातूर झाला होता. मात्र, ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पर्जन्यवृष्टी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून संततधारपणे पडणार्‍या तुफान पावसाने लांजा तालुक्यात जोरदार आगमन केले आहे. प्रचंड प्रमाणात आलेल्या पावसामुळे काजळी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सोमवारी पुरामुळे मठ येथे नदीकाठी वसलेले स्वयंभू श्री दत्त मंदिर हे पुन्हा एकदा पाण्याखाली गेले आहे.

जुलै महिन्यात हे मंदिर नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेले होते. त्या पाठोपाठ पुन्हा आता ऑगस्ट महिन्यात काजळी नदीला प्रचंड पूर यामुळे हे मंदिर पाण्याखाली गेले असून मंदिर परिसराला पूर्णपणे पाण्याचा वेढा पडला आहे. तर नदीवर असलेल्या आंजणारी पुलावरील वाहतूक देखील थांबवण्यात आली होती. सोमवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने काजळी नदीला प्रचंड प्रमाणात पूर आल्याने नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून आंजणारी येथील ब्रिटिशकालीन पुल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता.

पोलिसांनी याठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहनांना थांबवून ठेवलेे होते. तर या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. यामध्ये काही वाहतूक ही पावसमार्गे वळवण्यात आली असून या ठिकाणी लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक तेजस्वीनी पाटील तसेच पोलिस आणि होमगार्ड या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. तब्बल पाच तासानंतर सोमवारी सायंकाळी चार वाजता आंजणारी पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली. याबरोबरच विलवडे येथील मुचकुंदी नदीला आलेल्या पुरामुळे हा रस्ता पाण्याखाली गेला आहेे.

Back to top button